आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेतत्त्वावरील मिळकतींचे धोरण महासभेत ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एक रुपया नाममात्र भाडेतत्त्वावर दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीकडे ‘दिव्य मराठी’ने विशेष वृत्तमालिकेद्वारे लक्ष वेधल्यानंतर आता येत्या महासभेत भाडेतत्त्वावर मिळकती देण्यासाठी विशेष धोरण ठरवले जाणार असल्याची माहिती महापौर अँड. यतिन वाघ यांनी दिली.
शहरातील अनेक मोक्याच्या जागांवर महापालिकेच्या मिळकती असून, त्यात व्यावसायिक संकुलापासून, तर छोट्या-मोठय़ा जागांचाही समावेश आहे. त्यात समाजमंदिर, अभ्यासिका, क्रीडांगणाचाही समावेश आहे. या जागा सामाजिक संस्था व मंडळांनी घेतल्या असून, यात काही ठिकाणी अभ्यासिकांसारखे चांगले उपक्रम पदरमोड करून चालवले जात आहेत. मात्र, लग्न व धार्मिक सोहळे, बॅँका, शैक्षणिक संकुलासारख्या उपक्रमांसाठी मिळकतीचा वापर करून नफा कमावण्याचे प्रकार घडत आहेत. उच्च न्यायालयाने नगरसेविका सीमा हिरे यांच्या सर्मथ मंडळाकडील नाममात्र भाडेतत्त्वावरील अभ्यासिका महापालिकेला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला. या सर्वांवर ‘दिव्य मराठी’ने विशेष वृत्तमालिका चालवून लक्ष वेधले होते. त्यानंतर ‘दिव्य मराठी’ने राउंड टेबल चर्चासत्रात नगरसेवक व विविध क्षेत्रांतील जाणकारांनी सुचवलेल्या पर्यायांची दखल घेऊन महापौरांनी महासभेत विशेष धोरण ठरवण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार, आता पुढील महासभेत मिळकती भाडेतत्त्वावर देताना काय अटी-शर्ती असाव्यात, याबाबत नियमावली करण्यासाठी डॉकेट ठेवले जाईल, असे वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, शहरातील महापालिकेच्या गाळ्यांबाबतही नियमावली ठरविली जाणार असून, त्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.