आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका बाजार ‘फुलणार’; चारशे वर्षांपासूनचा फूलबाजार आज स्थलांतरित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहराला ‘गुलशनाबाद’ अशी ओळख देणारा सराफ बाजाराच्या कोपर्‍यातील फूलबाजार आता गणेशवाडीतील नवीन पालिका बाजाराजवळ फुलणार आहे. सुमारे चारशे वर्षांपासून एकाच जागेवर असलेल्या या फूलबाजाराचे स्थलांतर शुक्रवारी (दि. 12) होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून ओस पडलेला पालिका बाजारही फुलणार आहे.

वाहतुकीच्या खोळंब्याचा प्रश्न चर्चेत येत असल्याने या विक्रेत्यांवर सतत टांगती तलवार होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने फूलविक्रेत्यांना नवीन पालिका बाजाराजवळील मोकळी जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यास प्रथम काही विक्रेत्यांनीच विरोध दर्शवला; परंतु आता त्यांनीही स्थलांतरित होण्याची तयारी दाखवली आहे. फूलबाजारात सध्या 41 विक्रेते दिवसभर व्यवसाय करतात. त्या व्यतिरिक्त सकाळी अनेक शेतकरी फूल विक्रीसाठी तेथे येतात.

पर्यायी जागेसाठी तयार
आम्ही बाजार हटवला नसता तर सतत अतिक्रमण निर्मूलनाची टांगती तलवार राहिली असती. त्यामुळे स्थलांतराची तयारी दर्शवली. सर्व विक्रेत्यांना विश्वासात घेऊन स्थलांतर होत आहे.
-कृष्णकुमार गायकवाड, अध्यक्ष, जिल्हा माळी समाज मंडळ

अन् ‘बोहणी’ झाली..
गोदाघाटावरील भाजी विक्रेत्यांसाठी गणेशवाडीत पालिका बाजाराची इमारत बांधली आहे. तेथे जाण्यास विक्रेत्यांनी नकार दिल्यामुळे ती विक्रेते-ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. आता फूलविक्रेत्यांनी या इमारतीजवळ व्यवसाय करण्याची तयारी दर्शविल्यामुळे इमारतीचीच ‘बोहणी’ या निमित्ताने झाल्याचे बोलले जात आहे.

विक्रेत्यांबरोबरचा करार
> फूल बाजारासाठी प्रत्येकी 6.5 X 6.5 = 42 चौरस फूट क्षेत्रफळ जागा महापालिका वापरण्यास देईल.
> दिलेल्या जागेच्या क्षेत्रफळाव्यतिरिक्त जागा विक्रेत्यांना वापरता येणार नाही
> महापालिकेस या खुल्या जागेची आवश्यकता वाटल्यास सात दिवसांची नोटीस दिली जाईल.
> या जागेचे हस्तांतरण, पोटभाडेकरू, बक्षीस, गहाण आदी करता येणार नाही.
> खुल्या जागेत भागीदार घेता येणार नाही.
> या जागेवर केवळ फूलविक्रीचाच व्यवसाय करता येईल.
> बाजाराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी विक्रेत्यांची आहे.