आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांसाठी 75 लाखांचा भरघाेस विकास निधी देणार; अंदाजपत्रकीय महासभेत महापाैरांची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महासभेत साेमवारी महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सादर केले. - Divya Marathi
महासभेत साेमवारी महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सादर केले.
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीचे पडसाद अंदाजपत्रकावर उमटले असून घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी अाणि वाहतुक व्यवस्था या संदर्भातील कामे तातडीने मार्गी लावण्याचे अादेश महापाैर रंजना भानसी यांनी महासभेत दिले. नगरसेवक निधीत तब्बल ३५ लाखांनी वाढ सुचवून यापुढे विकास कामांसाठी प्रत्येक नगरसेवकाला ७५ लाखांपर्यंत निधी खर्चास महापाैरांनी मंजुरी दिली. तसेच २० खेड्यांसाठी १० काेटींच्या निधीची तरतूद करण्यात अाली. 
 
स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी महासभेसमाेर १७९३ काेटींचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकावर तब्बल सहा तास चर्चा झडल्यानंतर महापाैरांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा हावाला देत या बैठकीत २२०० काेटींचे प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. नाशिकला दत्तक देण्याचा शब्द मुख्यमंत्री विसरलेले नसून घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी अाणि वाहतुक व्यवस्था यासंदर्भातील कामे प्राधान्याने हाती घेण्याची सूचना त्यांनी केल्याचे महापाैरांनी नमूद केले. 
 
३१प्रभागांचा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांसमाेर सादर करणार : शहरातील३१ प्रभागांमधील रस्ते, पाणी, गटारी अाणि अन्य कामांचे प्रस्ताव नगरसेवकांनी सादर करावेत. या प्रस्तावाचा प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन ताे मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाईल असे महापाैरांनी स्पष्ट केले. यातून नाशिकला विकास निधी उपलब्ध हाेईल असेही त्यांनी सांगितले. 
 
एलइडीचे प्राकलन पुढील महासभेत : ग्रामीण भागाचे नेतृत्व करताना तेथे १५- १५ तास भारनियमनाचा तास ग्रामस्थांना सहन करावा लागत असल्याचे महापाैरांनी सांगितले. त्यामुळे शहरात सर्वत्र एलइडी दिवसे बसविण्याचे प्राकलन तयार करण्यात अाले अाहे. यासाठी २५ काेटींचा अंदाजीत खर्च गृहीत धरण्यात अाला अाहे. या संदर्भातील प्राकलन अागामी महासभेत सादर करण्याचे अादेश यावेळी महापाैरांनी दिले. 
 
स्मार्ट सिटीसाठी कार्यशाळा : स्मार्टसिटीत काेणत्या बाबींचा समावेश असेल, कामकाज, त्यातील तांत्रिक बाबी काेणत्या असतील याविषयी नगरसेवकांची दाेन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले. 
 
उत्पन्न वाढीसाठी नगरसेवकांनी हे सुचविले उपाय 
- भाडे देणाऱ्या हाॅकर्सचे लायसन्स रद्द करावे 
- मालमत्ता कर एकाच वेळी भरता येईल अशी व्यवस्था व्हावी 
- माेकळ्या जागा बीअाेटीवर द्याव्यात 
- जाहीरात कर वाढविण्यात यावा 
- हाेर्डींगचे सर्वेक्षण करावे 
- घरपट्टी पाणीपट्टीतील चाेरी राेखण्यासाठी विशेष उपाय याेजावेत 
- महापालिकेतील शाैचालये सीएसअार निधी अंतर्गत विकसित करावेत 
- वाहनतळासाठी निविदा प्रसिध्द करण्यात याव्यात 
- जुन्या इलेक्ट्रीक फिटींगचे अाणि वाहनांचे लिलाव करावे 
- सर्वच झाेपडपट्ट्यांना घरपट्टी लागू करावी 
- तपाेवनातील साधुग्रामसाठी अारक्षीत जागेत ट्रेड फेअर सेंटर किंवा प्रदर्शन केंद्र विकसित करावे 
- मेघवाळ समाजातील सफाई कर्मचाऱ्यांच्या इमारतींचा पुनर्विकास करावा त्यात खालच्या मजल्यावर दुकाने.  
 
मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावावरून भाजपला विराेधकांचे चिमटे 
‘दत्तक नाशिक’ची घाेषणा केल्यानंतर त्यास मूर्त स्वरूप देण्यासाठी अालेले परंतू नाशिककरांना ठाेस असे काहीच देता परतल्यामुळे भाजपला खिंडीत गाठण्याची संधी शिवसेना, राष्ट्रवादीने साेडली नाही. म्हणूनच की काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेत स्वागत मान्य मात्र, अभिनंदन नको, अशा शब्दांत विरोध दर्शवित भाजपला विराेधकांकडून चिमटे काढण्यात अाले. 
 
अंदाजपत्रकीय महासभेच्या सुरूवातीला भाजपचे गटनेते संभाजी मोरूस्कर, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विकासासाठी माेठ्या प्रमाणात निधी देण्याचे अाश्वासन दिल्याचा दावा करण्यात अाला. प्रत्यक्षात निधीबाबत स्पष्ट घाेषणा नसल्यामुळे विराेधी पक्षाचे नगरसेवक अाक्रमक झाले.
 
मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच महापालिकेत आल्यामुळे त्यांचे निश्चितपणे स्वागत करायला हवे. परंतू त्यांनी नाशिकला खराेखरच काय दिले हे सत्तारूढ पक्षाने तपशीलवार सांगावे, अशी भूमिका विराेधी पक्षांनी घेतली. त्यानंतर खरच नाशिकला माेठे काही मिळणार असेल तर मात्र हा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्याची भूमिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी घेतली. त्यामुळे भाजपची चांगलीच काेंडी झाली. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांना बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून घेता येईल मात्र अामच्या विराेधाची सूचना नाेंदवून घ्या, असा चिमटा काढल्यामुळे भाजपेयी अस्वस्थ झाले. गुरमित बग्गा यांनी नगरसेवकांना बैठकीपासून दूर ठेवल्याबाबत खंत व्यक्त केली. 
 
महासभेतील प्रमुख निर्णय असे 
-२० खेड्यांसाठी १० काेटींच्या निधीची तरतूद करण्यात अाली. 
- स्मशानभूमीच्या विकासासाठी १० काेटींची तरतूद 
- पाण्याची गळती राेखण्यासाठी इलेक्ट्राॅनिक मिटर्स लावण्यात येणार 
- माेबाइल टाॅवरच्या वसुलीसंदर्भातील नियमावलीसाठी महासभेत स्वतंत्र प्रस्ताव सादर हाेणार 
- अाडगावच्या स्मशानभूमीतील अडचणी साेडविणार 
- अानंदवली येथील स्मशान भूमित सुधारणा करणार 
- पिंपळगाव खांब येथील एसटीपीसाठी भूसंपादन तातडीने करणार 
 
१४१० काेटींचे अायुक्तांचे अंदाजपत्रक 
१७९९ काेटींचेस्थायी समितीचे अंदाजपत्रक 
२१०० काेटींच्यावर जाणार महासभेचे अंदाजपत्रक 
३८९.२३ लाखांची स्थायीने सुचविली वाढ 
 
बातम्या आणखी आहेत...