आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे पक्षप्रवेश बदलवणार समीकरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनेतील नव्या पक्षप्रवेशांमुळे महापालिकेच्या अागामी निवडणुकीतील समीकरणे काही प्रमाणात बदलणार असल्याची चिन्हे अाहेत. त्यामुळे अाता शहराचे लक्ष अाता नाशिकराेडच्या प्रभागांकडेही असणार अाहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक जसजशी तोंडावर येत आहे, तसतसे आयाराम आणि गयारामांची संख्या वाढू लागली आहे. नाशिकरोडला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस अाणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतून भाजप आणि शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकरोडला प्रभाग असून, त्यामध्ये इच्छुकांची संख्या अफाट आहे. पक्षश्रेष्ठीही जो येईल त्याला सामावून घेण्यात धन्यता मानत आहे. मात्र, पूर्वीपासून जे पक्षात अाहेत, त्यांचा उमेदवारीसाठी विचार होतो की नाही हे भविष्यात समजेलच.

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे सत्तेत होते तेव्हा त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कैलास मुदलियार यांचे लहान बंधू गिरीश मुदलियार यांनी मंगळवारी सेनेत अधिकृतरित्या प्रवेश घेतला. तसेच मनसेचे माजी गटनेते तथा नगरसेवक अशोक सातभाई, माजी नगरसेवक अॅड. सुनील बोराडे यांनीही शिवबंधन बांधले. प्रभाग २० मधून मुदलियार शिवसेनेकडून इच्छुक असले, तरी मनसेमध्ये स्थायी सभापतीपद भूषविलेले आणि नगरसेवक असलेले रमेश धोंगडे यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रभागात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण असल्याने शिवसेना कोणालाही उमेदवारी बहाल करते याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे क्षेत्र वाढल्याने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांना काट्याची टक्कर द्यावी लागण्याची शक्यता आहे. प्रभाग १८ मध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला आणि मागासवर्ग प्रवर्ग महिला याचे आरक्षण अाहे. या प्रभागात इच्छुकांची गर्दी असल्याने पक्षश्रेष्ठींचीही उमेदवारी देताना कसरत होणार आहे. सर्वसाधारण गटातून अशोक सातभाई यांना उमेदवारी दिली तर शिवा ताकाटे, विक्रम खरोटे यांना न्याय कसा द्यावा असा प्रश्न पक्षासमाेर उभा ठाकणार अाहे. नगरसेविका रंजना बोराडे यांना महिला गटातून उमेदवारी मिळू शकते.परंतु जुन्या काळापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्यांचीही संख्या प्रभागात माेठी अाहे. त्यामुळे निवडणुकीचे शिवधनुष्य नेमके कोणाच्या हातात येते हे काळच ठरवेल.

वाढलेल्या क्षेत्राचे आव्हान
नव्यारचनेमध्ये हक्काचे काही भाग वगळले गेले असताना, काही नवे भाग जोडले गेल्याने अशा वाढलेल्या क्षेत्राचेही आव्हान उमेदवारांना पेलावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...