आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा करदात्यांना ऑनलाइन त्रास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरपट्टी व पाणीपट्टी हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमख स्रोत आहेत. पालिकेच्या तिजोरीत भर घालणार्‍या या दोन प्रमुख करांचा भरणा वाढावा या उद्देशाने महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित केली. या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या किंवा विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध कर भरता येतात. परंतु, तरीही थकबाकी असलेल्यांची संख्या अधिकच असल्याने पालिकेने नवीन वर्षात थकबाकीधारकांवर 24 टक्के दंड आकारला आहे.
दंडाच्या भीतीने अनेकांनी 31 डिसेंबरच्या अगोदरच कर भरणा केला. परंतु, तरीही ग्राहकांना थकबाकी असल्याच्या पावत्या मिळाल्या. त्यामुळे अनेकांना पालिकेच्या खेट्या मारून दुरुस्ती करावी लागली. काहींचे पैसे चक्क दुसर्‍याच्या नावाने भरल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा पैसे न भरता ग्राहकाचे थकबाकीच्या यादीतून नाव वगळण्याचा प्रताप पालिका अधिकार्‍यांनी केला आहे.
मखमलाबादचे कर्मचारी फिरस्तीवर : ऑनलाइन कर भरणा प्रक्रियेतील गोंधळाची तक्रार करण्यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयात तक्रार करण्यास जाणार्‍यांना त्याच विभागातील उपकार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यानुसार मखमलाबाद कार्यालयात जाणार्‍यांना कर्मचारी भेटतच नाही. यावर या कर्मचार्‍यांनी शक्कलही लढवून ठेवली आहे. स्वत:चा मोबाइल क्रमांक कार्यालयातील भिंतीवर लिहून ठेवला आहे. त्यावर संपर्क करणार्‍यांना सोयीनुसार भेटण्याची वेळ देण्यात येते. त्यानंतर मात्र तक्रार ऑनलाइन प्रक्रियेची असल्याची सबब सांगून थेट महापालिकेतील कर संकलन विभागाकडे बोट दाखवून बोळवण होते. या वेळी ‘ऑनलाइन कर भरतातच कशाला, तुम्हालाही त्रास आणि आमच्याही डोक्याला ताण,’ असा नागरिकांना मूर्खात काढणारा ‘पंच’ही मारला जातो.
माहिती ‘इनव्हॅलिड’
सोयीसाठी ऑनलाइन कर भरणार्‍या नागरिकांसाठी महापालिकेचे संकेतस्थळ एक अग्निपरीक्षा ठरते. घरपट्टी गोंधळात भर घालणारी आहे, तर ऑनलाइन पाणीपट्टीची खिडकी चमत्कारिक आहे. त्यावर इंडेक्स नंबर व घर क्रमांक टाकल्यानंतर ही माहिती ‘इनव्हॅलिड’ असल्याचा मेसेज येतो. त्यामुळे ही खिडकी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा तत्त्वावरच सुरू असल्याचे स्पष्ट होते.
घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठीच्या संकेतस्थळाचा उडाला बोजवारा
नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेकडून नवीन वर्षात ‘अँप’ तयार केले जात असले तरी दुसरीकडे घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी तयार केलेल्या ऑनलाइन यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. नागरिकांना घरबसल्या पालिका करांचा भरणा करता यावा, या उद्देशाने संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. वेळ व र्शम वाचविणार्‍या या सुविधेचा नागरिकांना फायदा होण्याऐवजी उलट मनस्तापच होत असल्याचे दिसून येते. ऑनलाइनच्या माध्यमातून करांचा भरणा करूनही थकबाकी असल्याचीच पावती मिळत असल्याने या सावळ्या गोंधळाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. पैसे न भरताही थकबाकीतून नावे कमी झाल्याचीही उदाहरणे आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाइन-ऑफलाइन खेळाचा फटका बसलेल्या काही घटनांवर टाकलेला हा प्रकाशझोत..