आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीकपात हेच लक्ष्य, मात्र नासाडीकडे दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूर धरणातील साठा तळ गाठत असून, पाणीटंचाई जाणवू लागल्याने महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला असतानाच, पाण्याच्या उधळपट्टीकडे मात्र प्रशासन डोळेझाक करीत असल्याचेही चित्र दुसरीकडे दिसते आहे. शहरातच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर पावसाळा लांबल्याने पाणी टंचाईचे सावट आहे. गंगापूर धरणासह बहुतांश धरणांनी तळ गाठला असून, चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आता दहा ते पंधरा दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पाणीकपातीचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
मात्र, प्रशासन पाणीकपातीची अंमलबजावणी करीत असताना दुसरीकडे पाण्याची सर्वत्र उधळपट्टी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्याच्या बचतीसाठी सामाजिक संघटनांकडून पुढाकार घेतला जात असताना महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे. पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी ठोस अशा उपाययोजना आखल्या जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, सावरकरनगर, पाइपलाइनरोड, महात्मानगर; तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, कामटवाडे भागातील रहिवासी भागातील बंगले, मंगल कार्यालये, लॉन्स येथे रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी केली जात आहे.

हे कसले सुशिक्षित: शहरातील विविध भागात स्वत:ला सुशिक्षित म्हणवणारे नागरिक नळीद्वारे तासन्तास अंगणात सडा मारत असल्याचे चित्र दिसते. त्यातच अनेक ठिकाणी तर दुचाकी, मालवाहू वाहने, कार धुण्याकरिता महापालिकेच्या पाण्याचा सर्रास वापर होत आहे. महापालिकेच्या उद्यानांत हिरवळीसह झाडांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र नळ जोडणी केलेली असली तरी या पाण्याचा व्यावसायिकच अधिक उपयोग करीत असल्याचेही चित्र अनेक ठिकाणी दिसते. भरवस्तीत उद्यानाच्या नळाला नळी जोडून रस्त्यावरच वाहने धुतली जात असून, याकडे प्रभागातील नगरसेवकही दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाला कधी येणार जाग?

प्रशासनाने पाणीकपातीची अंमलबजावणी सुरू केली असली तरी पाण्याची नासाडी करणार्‍यांविरोधात कधी जागे होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विभागीय अधिकारी-नगरसेवकांनी गांभीर्याने प्रभागात सकाळी पाहणी करून उधळपट्टी करणार्‍यांना जागेवरच दंड केल्यास निश्चितपणे याला अंकुश बसेल; पण अधिकार्‍यांची मानसिकताच नसल्याचे नगरसेवक उघडपणे बोलत आहेत.