आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोड प्रभाग सभेत नागरी समस्यांप्रश्नी नगरसेवक झाले आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- विभागातील प्रभागात उभारलेल्या विजेच्या खांबावर दिवे लावलेले नाहीत, खड्डे, पाणी साचलेली डबकी बुजवली नसल्याने प्रभाग समिती बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. वेगवेगळ्या मान्यवरांच्या निधनामुळे दोन वेळा तहकूब झालेली नाशिकरोड प्रभागाची सभा सभापती कोमल मेहरोलिया यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. वारंवार तक्रारी करूनही उभ्या खांबांवर दिवे लावले जात नसल्याची तक्रार मनसेच्या नगरसेविका शोभना शिंदे यांनी केली. गुंठेवारीच्या जागेवरील घरे असल्याचे कारण दिले जात असल्याचे सांगून दिवे लावणार नसतील, तर मानधनातून उभारलेले खांब काढण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे शिवाजी शहाणे यांनी बिटको रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. दिवसा-रात्री प्रत्येकी दोन पोलिसांच्या नियुक्तीसाठीचा खर्च महापालिकेने करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. सूर्यकांत लवटे यांनी बिटको रुग्णालयातील रक्तपेढी कर्मचा-यांकडून सामाजिक संस्था, मंडळांच्या रक्तदान शिबिराला सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला. मंगला आढाव यांनी दसक गावातील मळे विभागातील पथदीप, चिखलाच्या रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. राष्टÑवादीच्या वैशाली दाणी यांनी नगरसेवक, नागरिकांच्या लेखी-तोंडी तक्रारीची दखल घेतली जात नाही, आंदोलन करून प्रश्न सुटणार असतील, तर तशा मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा दिला. सभापती कोमल मेहरोलिया यांनी सदस्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याचे आदेश दिले.
23 कामांना मंजुरी : सभेत विविध 23 विकासकामांना चर्चेविना मंजुरी देण्यात आली. केशव पोरजे, कन्हैया साळवे, हरीश भडांगे, शोभा आवारे, रंजना बोराडे उपस्थित होते.

समस्यामुक्तीच्या आविर्भावात
नगरसेविकेचा ‘कोनशिले’साठी ठिय्या सभेत स्वत:च्या प्रभागासह विभाग समस्यामुक्त झाल्याच्या आविर्भावात काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चबुत-यावर कोनशिला लावली नसल्याच्या प्रश्नावर तासभर ठिय्या आंदोलन केले. नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची अपेक्षा असताना सभेला सुरुवात होताच नगरसेविका भागवत यांनी केलेले ठिय्या आंदोलन चर्चेचा विषय ठरले. विशेष म्हणजे या आंदोलनाची दोन तासांत दखल घेत प्रशासनाने पुतळा चबुत-यावर दोन तासांत कोनशिला बसविली.