आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: हृदय शस्त्रक्रियेतून मिळाले 21 बालकांना जीवदान; एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसएनबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये राजीव गांधी जीवनदायी याेजनेअंतर्गत हृदयराेगाच्या शस्त्रक्रिया झालेली २१ बालके. - Divya Marathi
एसएनबीटी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये राजीव गांधी जीवनदायी याेजनेअंतर्गत हृदयराेगाच्या शस्त्रक्रिया झालेली २१ बालके.
नाशिक : बालकांच्या हृदयाला जन्मत:च छिद्र, ज्या वयात खेळायचे त्या वयात रोजच जगण्याचा कठीण संघर्ष, सारे कुटुंबही चिंताग्रस्त, बालपणही विस्कटलेले, अशा तब्बल २१ बालकांना जीवदान देण्यात एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटच्या हृदयरोगतज्ज्ञांना यश आले. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना पोटच्या पोरांची शस्त्रक्रियाही करणे शक्य नव्हते, अशा बालकांच्या कठीण हृदय शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना नवजीवनच मिळाले आहे. 
 
याच दिवशी अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याची ओपन हार्ट सर्जरीही यशस्वी करण्यात आली. इन्स्टिट्यूटने या २१ यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयांना मोठा धीर दिला. या सर्व मुलांच्या हृदयाला जन्मजातच छिद्र होते. विना चिरफाड, छत्रीद्वारा या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. टीमने ही जोखीम पत्करत नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव, अहमदनगर भागातील या बालरुग्णांवर एकाच दिवशी या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या अाहेत. उपचार शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत केल्या जातात. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. यात ज्या बालकांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांतील अडथळे, छिद्र अन्य प्रकारचा दोष स्पष्ट होतात, अशा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात अाल्या अाहेत.
  
प्रत्येकाला अाजारातून मुक्तता 
दर्जेदार आणि चांगले हृदय उपचार देण्याच्या भूमिकेतून आम्ही कार्यरत आहोत. बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया ही जोखमीचीच बाब असली, तरी ती पत्करल्यामुळेच त्यांचे नवीन अायुष्य सुरू झाले अाहे. अद्यापही ज्यांना शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांनी इन्स्टिट्यूटशी संपर्क साधावा. -डॉ. गौरव वर्मा, हृदयराेगतज्ज्ञ 
 
तब्बल १६५ बालकांना वर्षभरात मिळाले जीवदान 
इन्स्टिट्यूटतर्फे बाल हृदयरोग शस्त्रक्रिया अभियान यंदाच्या वर्षात राबविले गेले. परदेशातील तज्ज्ञ डॉक्टर्सही निमंत्रित करण्यात आले. वर्षभरात १६५ बालकांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 
बातम्या आणखी आहेत...