आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ली टोपी फार्मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुढारपणाला केवळ वक्तृत्वशैलीच असणे गरजेचे नाही. त्यासाठी आवश्यक असतो तो पेहराव आणि डोक्यावर कोनेदार टोपी. यंदा तर ‘आम आदमी’मुळे या टोप्यांचेही ‘भाव’ वाढले असून, त्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे.निवडणुकीचा प्रचार उमेदवाराने गांधी टोपी घालून करावा, असा घटनेत कोठेही उल्लेख नसला तरीही पुढारी मंडळी या अलिखित नियमाचे निवडणूक काळात काटेकोरपणे पालन करताना दिसतात. यंदाही राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांचे चिन्ह असलेले मफलर आणि तत्सम बिल्ले खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. टोप्यांचीही नोंदणी मोठय़ा प्रमाणात होत आहे.


इको-फ्रेंडली टोप्या
आम आदमी पार्टीच्या वतीने इको फ्रेंडली टोप्यांचे वितरण करण्यात येत आहे. यात ‘नॉन वोव्हन फॅब्रिक’ (विणकाम केलेले)चा वापर होतो. ही टोपी बाजारातून खरेदी केली तर दहा रुपयांपर्यंत ती मिळते.


खादीला उतरती कळा
खादीच्या टोप्या 30 ते 35 रुपयांना, तर साध्या टोप्या चार रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत मिळतात. खादी टोप्यांकडे तरुणवर्ग फारसा वळताना दिसत नाही. जुने खरेदीदारही कमी झाल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे.


आपच्या 20 हजार टोप्या
आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमात टोपीधारी तरुणांची गर्दी दिसते. नाशिकमध्ये पक्षाने गेल्या महिन्यात दहा हजार टोप्या खरेदी केल्या होत्या. या पक्षाने निवडणुकीसाठीही दहा हजार टोप्यांची आगाऊ नोंदणी केली आहे. अर्थात, प्रत्येक टोपीद्वारे पक्षनिधीतही ‘थेंबे थेंबे’ वाढ होत आहे. टोपी उत्पादकाकडून झालेली खरेदी आणि कार्यकर्त्यांना केलेली विक्री यात अल्पशी वाढ करून या वाढलेल्या उत्पन्नाचा पक्षनिधी म्हणून वापर केला जात आहे.


खादीची किंमत अधिक
खादीच्या टोप्यांची किंमत बघून अनेक लोक त्या खरेदी करण्यास नकार देतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा टोप्यांची विक्री कमी झाली आहे. खादीच्या अन्य कपड्यांना चांगली मागणी आहे. मात्र, टोप्या खरेदीकडे खरेदीदारांचा कल सध्या कमी झालेला आहे. विजय शेलार, व्यवस्थापक, खादी भांडार


किंमत, दर्जावर भर
आम आदमी पार्टीच्या टोप्या तयार करण्यासाठी आम्ही विशेष पर्शिम घेतले आहेत. कमी किमतीत दर्जेदार टोप्या कशा तयार होतील यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मोठय़ा संख्येने या टोप्यांची खरेदी होत असल्याने त्या आम्ही अतिशय कमी किमतीत विकल्या आहेत. हरीश सूर्यवंशी, टोपी उत्पादक