आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Budget Of Health Science University

आरोग्य विद्यापीठाचा संशोधनावर भर, अर्थसंकल्प मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर केला. त्यात संशोधनासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. 142 कोटींपैकी 1 कोटी 20 लाख रुपये केवळ संशोधनासाठीच राखीव ठेवण्यात आले असून, विद्यार्थी कल्याण निधीतूनही त्यासाठी खर्च होईल.


चालू वर्षातील पहिली अधिसभा 26 फेब्रुवारीस विद्यापीठात पार पडली. त्यात 2014-15 चा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. त्यास अधिसभेने मंजुरी दिली. हा अर्थ संकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे. विद्यापीठास एकत्रित उत्पन्न 142 कोटी 48 लाख अपेक्षित असून, खर्च 144 कोटी 4 लाख 70 हजार इतका आहे. त्यानुसार 1 कोटी 56 लाख 70 हजाराची तूट अपेक्षित आहे. अर्थसंकल्पात विविध खासगी, निमशासकीय, शासकीय संस्थांना एकत्रित करून समाजातील विविध घटकांनी केलेल्या संशोधनास प्रसिध्दी व प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसमावेशक केंद्रासाठी (आय फोर सी ) 50 लाख रुपये, नवीन संशोधनाची विद्यार्थी, शिक्षकांना माहिती व्हावी, त्यांचे ज्ञान अद्यावत व्हावे यासाठी सर्व समावेशक नवीन संशोधनसाठी विद्यापीठाच्या पुणे व औरंगाबाद येथील विभागीय केंद्रावर विविध उपक्रम आयोजनासाठी 50 लाख, तर शिक्षक संशोधन प्रोत्साहनासाठी 14 लाख, संशोधन पध्दती केंद्र नाशिक मुख्यालय तेथे निर्माण करण्यासाठी 5 लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. किशोर टावरी यांनी हा अर्थ संकल्प सादर केला. तर मागील वर्षाचा अहवाल जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी सादर केला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अरुण जामकर होते. यावेळी कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर, प्रतिकुलगुरू डॉ. नितीन गंगणे, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. रागिणी पाटील, डॉ. किशोर मालोकर, डॉ. डी.जी. म्हैसेकर यांसह अधिसभेचे सभासद उपस्थित होते.


अशा आहेत इतर तरतुदी
30 लाख रुपये विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य प्रशिक्षणासाठी, विद्यार्थी कल्याण योजनांसाठी 2 कोटी, समुपदेशनासाठी 10 दहा लाख, आपत्ती व्यवस्थापनासाठी 60 लाख, ग्रामदत्तक योजनेसाठी 10 लाख, छळवणूक प्रतिबंधात्मक उपायांसाठी 25 लाख, अधिकारी -कर्मचारी कल्याणकारी योजनांसाठी 1 कोटी 86 लाख, नॅक दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक खर्च 25 लाख, फेलोशिपसाठी एक कोटी, परीक्षा भवन इमारतीसाठी 5 कोटी, आपत्कालीन व्यवस्थापन शाळेसाठी 30 लाख यासह विविध बांधकामांसाठी तरतूद केली आहे.