आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Chhagan Bhujbal Contests Lok Sabh From Nashik

नाशकात सेना, मनसे, आपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी छगन भुजबळ रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रवादीने लोकसभेसाठी नाशकातून विद्यमान खासदार समीर भुजबळ यांच्याऐवजी बडे मियाँ छगन भुजबळ यांना मैदानात उतरवल्याने ही लढत पक्षासाठी आणि भुजबळांसाठीही चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे. शिवाय, साक्षात मोठे भुजबळ रिंगणात उतरल्याने आता या निवडणुकीचे संदर्भ मुळातूनच बदलणार आहेत.
मोदींची असलेली सुप्त लाट, मनसेची नाशकातली मजबूत संघटन बांधणी आणि राज यांचा प्रभाव, तसेच आम आदमी पक्षाबद्दल सर्वसामान्यांत असलेले आकर्षण व त्यातच या पक्षाने दिलेला विजय पांढरेंसारखा चेहरा या सगळ्याचा परिपाक म्हणजे छगन भुजबळ यांची उमेदवारी असल्याचे म्हणावे लागेल. कारण, राष्ट्रवादीला यंदा एक-एक जागा अत्यंत महत्त्वाची असल्याने अतिरथी-महारथींना निवडणुकीत उतरवण्याचे अगोदरपासून ठरले होते. त्यानुसारच, आता मोठ्या भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असणार! वास्तविक, समीर यांनी गेल्या पाच वर्षांत केलेले कामकाज पाहता आणि आजवरच्या येथील बहुसंख्य खासदारांशी त्याची तुलना करता गुणवत्तेच्या आधारे त्यांचे तिकीट कापले जाऊ शकत नव्हते. पण, केवळ कामकाज वा गुणवत्तेपेक्षा निवडून येण्याची क्षमता हा घटक तिकीट निश्चितीवेळी अधिक महत्त्वाचा ठरतो. त्याच आधारावर छगन भुजबळांसारखा सर्वार्थाने ‘हेवीवेट’ उमेदवार दिला गेला आहे. पण, तेवढ्यानेच सारे काही भागेल अशी स्थिती खचितच नाही.


भुजबळांच्या जमा खाती बरेच काही असले तरी दुसरीकडे वजाबाकीचा आकडासुद्धा तसा फुगत जाणारा आहे. ‘इलेक्टोरल मेरिट’साठी आपल्याकडे आवश्यक असणा-या तीन एम ‘फॅक्टर्स’पैकी मनी आणि मसल यामध्ये त्यांची बाजू इतरांच्या तुलनेत कैक पट उजवी आहे. मात्र, तिसरा एम म्हणजेच मराठा समाज ही भुजबळांची डोकेदुखी ठरू शकते. गेल्या वेळी जातीयतेच्या मुद्यावरून समीर यांची झालेली दमछाक भुजबळ काका-पुतण्यांना आजही चांगलीच स्मरत असणार. अर्थात, त्यातही सध्या अनेक सुप्त प्रवाह आहेत. कारण, मुळातच विरोधात किमान दोन मराठा समाजाचे उमेदवार असतील. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या दुस-या फळीतील बहुतेक नेत्यांनाही भुजबळ दिल्ली मुक्कामी गेले तर ते हवेच आहेत. विशेषत: माणिकराव कोकाटेंसारख्यांची स्थानिक पातळीवरची ‘सीनिअ‍ॅरिटी’ त्यामुळे आपसूकच वाढणार आहे. हा हिशेब केला तर त्यांच्यासारख्यांचा संभाव्य अंतर्विरोध सौम्य होऊ शकतो. अनुभव, वक्तृत्व आणि प्रचंड मोठी यंत्रणा याही भुजबळांच्या जमेच्या बाजू आहेत; परंतु त्याच वेळी आता मध्ये कुठलीही ‘फायर वॉल’ उरलेली नाही. गेल्या काही दिवसांत टोल असो की ‘एमइटी’तील कथित गैरव्यवहारांचा मुद्दा असो, विरोधकांनी भुजबळांना भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून वारंवार घेरले आहे. त्यामुळे या मुद्यावरून टीकेसाठी भुजबळ विरोधकांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरले तर नवल वाटू नये. राज असोत की ‘आप’, या मंडळींना थेट भुजबळांवर आरोपांची राळ उडवून देणे आता अधिक सोपे जाणार आहे. आरोपांमध्ये तथ्य किती, हा मुद्दा असला तरी त्यामुळे एखाद्याच्या प्रतिमेवर आणि जनमानसावर विपरीत परिणाम होतो, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यातही नाशकात अगोदरच भुजबळांच्या कंपूविषयी समाजमनात एकप्रकारची नकारात्मकता आहे. त्यामुळे एकीकडे विकासाचा डंका वाजवताना, दुसरीकडे स्वप्रतिमेला आता आणखी तडे न जाऊ देण्यावर भुजबळांना कटाक्ष ठेवावा लागेल.


त्याबरोबरच स्वपक्षातला अजित पवार यांना मानणारा गट हा मुद्दाही आहेच. तूर्त हा गट भुजबळांच्या विरोधात असला, तरी इथे नेमके काय करावे त्याविषयी अद्याप संबंधितांमध्ये संभ्रम आहे. कारण, ज्या पांढरे यांच्यामुळे अल्पकाळ का होईना अजित पवारांना पदच्युत व्हावे लागले, त्या पांढरेंना दादा गटाचा अधिक टोकाचा विरोध असणार. अशा स्थितीत हा गट शिवसेनेशी सलगी करू शकतो. त्यासह मोदी फॅक्टर हासुद्धा युतीच्या उमेदवाराला लाभदायी ठरेल. पण, हे सारे योग्यरीत्या ‘इन्कॅश’ करणे सेनेच्या उमेदवाराला जमायला हवे. मनसेची क्रेझ गतवेळच्या तुलनेत आज कमी झाली असली तरी राज यांचा करिष्मा मनसेत कितपत चैतन्याचे वारे निर्माण करू शकेल, हे काळच ठरवेल. अर्थात, भुजबळ यांना पर्याय ‘उत्तम’ द्यायचा की सध्या सुरू असलेल्या ‘उपचारावर’च भागवायचे, हा कळीचा मुद्दा अधांतरी आहे. अशात नजीकचा प्रतिस्पर्धी नेमका कोण, तेच निश्चित करणे हा तूर्त भुजबळांसमोरचा खरा प्रश्न आहे. (गतवेळी नेमकी हीच गफलत झाल्याने मनसेच्या हेमंत गोडसेंनी समीर यांच्या तोंडाला फेस आणला होता.) एकुणात, ही तर केवळ सुरुवात आहे, खरी गंमत पुढेच आहे...