आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Cleaning Campaign In Nashik City

कचर्‍याविरोधातील 'ब्लॅक स्पॉट' मोहिमेचा महापौरांच्या प्रभागात फज्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - निवडणुकीच्या तोंडावर ‘ऑपरेशन नाशिक क्लीन’अंतर्गत सुरू केलेल्या कचर्‍याविरोधातील ‘ब्लॅक स्पॉट’ मोहिमेचा महिनाभरातच फज्जा उडाल्याचे चित्र दस्तुरखुद्द महापौर अँड. यतिन वाघ यांच्याच प्रभागात आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दहापैकी आठ ब्लॅक स्पॉटवर दिवसाढवळ्या कचर्‍याचे ढीग असून, नाशिककरांवर ये-जा करतेवेळी नाक दाबून वावरण्याची वेळ आली आहे.


नवनिर्माण तर सोडा; मात्र मूलभूत प्रश्न सोडविण्यात मनसे अपयशी ठरल्याच्या तक्रारी ऐकून राज ठाकरे यांनी महापौरांसह नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यानंतर शहरातील अतिक्रमणे हटवणे व स्वच्छता मोहिमा राबवण्यास धडाधड सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून महापौर यतिन वाघ यांनी पंचवटी, सातपूर, पश्चिम व सिडको विभागातील सात प्रभागांत प्रायोगिक तत्त्वावर ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाची प्रायोगिक तत्त्वावरील मोहीम हाती घेतली. प्रत्यक्षात महिन्यानंतर योजनेचे तीन तेरा वाजले असून, ‘दिव्य मराठी’ने महापौर यतिन वाघ यांच्या प्रभागात गुरुवारी दुपारी 2 वाजता केलेल्या पाहणीत ही बाब अधोरेखित झाली.


कोण करेल दंड?
महापालिकेने जाहीर केलेल्या ब्लॅक स्पॉट मोहिमेंतर्गत प्रथम नागरिकांना कचरा न टाकण्याविषयी आठ दिवस आवाहन केले जाणार होते. त्यानंतर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी अमूल्य क्लीनअप तसेच सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाईल, असेही जाहीर केले. प्रत्यक्षात दिवसभर कचरा टाकणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी एकही कर्मचारी तैनात नव्हता. परिणामी, दंडात्मक कारवाईचा धाकही उरला नाही.


महापालिकेने जाहीर केलेल्या ब्लॅक स्पॉटची गुरुवारची स्थिती
गंगावाडी : या ब्लॅक स्पॉटवर तुलनेत कचरा कमी होता; मात्र मोकाट जनावरे होती. येथे कचरा कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे सफाई कर्मचार्‍यांचे हजेरीशेड याच स्पॉटवर आहे.
घनकर लेन : स्वच्छतागृहालगत रस्त्याच्या कोपर्‍याला नेहमीप्रमाणे कचरा लावून ठेवलेला होता. अशोक स्तंभाकडे पायी जाणार्‍यांना परिणामी नाक दाबून चालावे लागत होते.


मुख्य रस्त्यातच ठेवले बांधकाम साहित्य
ब्लॅक स्पॉट निर्मूलनाबरोबरच रस्त्यावर टाकले जाणारे बांधकाम साहित्य जप्त करण्याचे महापौरांचे आदेश होते. प्रत्यक्षात पेठे हायस्कूलसमोर सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पसरलेले होते. मुख्य रस्त्यावरच असा काणाडोळा होत असल्यामुळे कॉलनी रस्त्यावरील बांधकामाबाबत विचारच न केलेला बरा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
पेठे शाळेमागील गल्ली : या ठिकाणी कचर्‍याचा ढीग साचलेला आहे.
वकीलवाडी : पंचवटी हॉटेलसमोरील रिकाम्या बंगल्यालगत नेहमीप्रमाणे कचरा साचलेला होता. मात्र, त्याचे प्रमाण मागील दिवसांपेक्षा कमी झालेले होते.
फूलबाजार : येथील शौचालयाजवळ नेहमीप्रमाणे कचर्‍याचे ढीग पडलेले होते. भूमिगत गटारीच्या जाळ्याही कचर्‍यामुळे बंद झालेल्या होत्या. यामुळे कचर्‍यासह दुर्गंधी जाणवत होती.

सकाळीच सफाई केली
ब्लॅक स्पॉटवरील कचरा हळूहळू कमी होत असून, सकाळी घंटागाडी फिरवून सर्व कचरा उचलला आहे. पुन्हा झाला असल्यास साफ करून घ्यायला लावतो. आर. बी. गाजरे, स्वच्छता निरीक्षक