आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Clinical Attach Lab, Indian Medical Association, Divya Marathi

अनधिकृत रक्त चाचणी प्रॅक्टिसला आता ‘कट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - क्लिनिकल अटॅच लॅब थाटून यंत्रसामग्रीविनाच चालणार्‍या रक्त संकलन केंद्रांना इंडियन मेडिकल असोसिएशनने वेसण घातली असून, अशा अनधिकृत केंद्रांत रुग्णांना न पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पॅथॉलॉजिस्टच्या स्वाक्षरीनिशी अहवाल असल्यासच उपचार करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे. ‘दिव्य मराठी’ने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर आयएमएने याबाबत हा पुढाकार घेतला आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर त्यामागच्या कारणांचा ‘दिव्य मराठी’ने माग घेतला असता डेंग्यूची चाचणी करण्यासाठी 1200 रुपये घेऊन त्यातील 700 रुपये शिफारसकर्त्याच्या खिशात जात असल्याचे उघड झाले. मोठे पॅथॉलॉजिस्ट अशा चाचण्यांसाठी जेमतेम 500 रुपये घेत असताना उर्वरित 700 रुपयांचा मोठा ‘कट’ कोणाकडे जातो याचाही पर्दाफाश झाला. त्यानंतर नाशिकमधील पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन, वैद्यकीय महाविद्यालये व आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावरच कट प्रॅक्टिसला विरोध केला. याबाबत राज्य स्तरावरील संघटनेकडेही पाठपुरावा केल्यानंतर चर्चेअंती सर्वच जिल्हा कार्यकारिणींना 14 मार्चला एक पत्र पाठवण्यात आले. त्यात पॅथॉलॉजिस्टच्या स्वाक्षरीशिवाय रक्त व अन्य चाचण्यासंदर्भात अहवालावर आधारित उपचार डॉक्टरांनी करू नये, यासह अनधिकृत चाचणी केंद्रांत रुग्णांना न पाठवण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे.
काय आहे आयएमएच्या पत्रात
अनधिकृत केंद्रांच्या अहवालावर विसंबून उपचार केल्यानंतर रुग्णास धोका पोहोचला तर डॉक्टरांना काय अडचणी येतील, हे त्यात स्पष्ट केले आहे. अशा केंद्रांत पाठवल्यामुळे वैद्यकीय आचारसंहितेचा भंग होतो. अशा केंद्रांत पाठवण्याची शिफारस का केली, अशी विचारणा करून न्यायालय थेट डॉक्टरलाच दोषी ठरवू शकते. अनधिकृत केंद्रातील चाचणीमुळे रुग्णांना विम्याचा लाभही मिळत नाही. अशा केंद्रांत पाठवणारा डॉक्टर व तंत्रज्ञाकडून विम्याची रक्कम ग्राहक न्यायालयाने भरून घेतल्याचे वाशिम ग्राहक न्यायालयाच्या आदेशाचे उदाहरण पत्रात दिले आहे.
डॉक्टरांमध्ये जागृती
मान्यताप्राप्त पॅथॉलॉजिस्टकडेच रुग्णांना पाठवण्यासाठी डॉक्टरांना जागृत केले जाईल. आयएमएची नाशिक शाखा पुढाकार घेऊन ठोस योजनाही तयार करेल. डॉ. सुशील अहिरे, सचिव, आयएमए, नाशिक
पॅथॉलॉजिस्टलाही इशारा
‘दिव्य मराठी’च्या तपासात अनेक पॅथॉलॉजिस्ट वैयक्तिक तपासणी न करताच अहवाल देत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर आयएमएने पॅथॉलॉजिस्टला अहवाल न पाहता स्वाक्षरी न करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली मेडिकल कौन्सिलने डॉ. राकेश भटनागर यांची नोंदणी तात्पुरती रद्द केल्याचे उदाहरणही दिले आहे.