आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Combing Operation, Crime

नाशकात दिवसा झालेल्या घरफोड्यांत 5 लाखांची लूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात कोम्बिंग ऑपरेशनला काही तास उलटत नाही तोच महामार्गालगतच्या पेठेनगरात एकाच इमारतीतील दोन घरांचे लॅच तोडून सुमारे तीन लाखांचा, तर सिडकोत दोन लाखांचा ऐवज लांबवल्याच्या घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडल्या.


हॉलमध्ये कुटुंबीय असताना मागील दाराचा कोयंडा तोडून चोरांनी घर साफ केले. या वेळी अपार्टमेंटमधील इतर फ्लॅटच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. पेठेनगर कोपर्‍यावरील शांतीमंगल अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणारे पवन जैन कुटुंबीय हॉलमध्ये असताना लगतच्या बेडरूमचा कोयंडा तोडून चोरी झाली. जैन यांच्या पत्नी सकाळी 11 वाजता मुलांचे कपडे बेडरूममधून काढल्यानंतर लॅच लावून हॉलमध्ये आल्या. अवघ्या दहा मिनिटांत पुन्हा बेडरूम उघडण्यासाठी गेल्या असता त्यांना लॅच तुटलेले दिसले. कपाटाचे लॉकर फोडून त्यातील तीन-चार तोळे सोन्याचे दगिने, रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.


अन् पहिल्या मजल्यावर : शांतीमंगल अपार्टमेंट-एकमधील सुनंदा वर्मा व त्यांचा मुलगा अक्षय तळमजल्यावरील दुकानात असताना मित्राने अक्षयला शेजारी चोरी झाल्याचे फोनवर सांगितले. त्यावर अक्षयने ‘हो, मला कळाले. मी दुकानातच आहे’ असे सांगितल्यावर ‘तुमचा दरवाजा तर उघडा दिसतो’ असे मित्र म्हणताच अक्षय घराकडे पळत गेला. कपाटाचे लॉकर तोडत सुमारे आठ तोळे सोने, 40 हजार रु. रोख असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लांबवण्यात आला होता. हा प्रकारही दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडला.


सिडकोतही घरफोड्या
पेठेनगरातील घरफोड्या होण्यापूर्वी काही तास आधी सिडकोतील बुरकुले हॉलमागील परिसरात व राणेनगर येथे घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लांबवण्यात आला.


टोळीच्या मागावर
घरफोड्या रोखण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन टोळ्यांचा तपास लागला असून, त्यांच्या मागावर आहोत. लवकरच टोळी पकडण्यात यंत्रणेला यश येईल. डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस उपआयुक्त