आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Divya Marathi, Crime, Police, Security

रिक्षाचालकांच्या मग्रुरीने धास्तावले पोलिस,रक्षकांनाच गरज सुरक्षितेची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्याच पोलिसांच्या अंगावर हात उचलण्याचे धाडस रिक्षाचालक, मद्यपी व टवाळखोरांकडून होत असल्याने पोलिस यंत्रणेचा वचक कमी होत चालला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. काही रिक्षाचालकांच्या मग्रुरीमुळे सामान्य प्रवाशांच्या पोटातही भीतीचा गोळा उठला असून, पोलिसांनी वेळीच अशांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


तोतया पोलिसांचा धुमाकूळ सुरू असताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आले असतानाच थेट पोलिसांवरच हात उचलण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारच्या घटना पुढीलप्रमाणे आहेत.


वाहतूक पोलिस ‘लक्ष्य’
* घटना पहिली
स्थळ : दिंडोरी नाका, प्रकार : फ्रंटसिट बसविल्याने रिक्षाचालकाला रस्त्यात अडविले असता हवालदार बबन निवृत्ती तिडके यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि. 16) घडली. या रिक्षाचालकाने तिडके यांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला.
* घटना दुसरी
स्थळ : शालिमार चौक, प्रकार : दि. 12 एप्रिल रोजी शालिमार चौकात रस्त्यात रिक्षा उभी करून प्रवासी बसविणार्‍या रिक्षाचालकास वाहतूक शाखेचे कर्मचारी शशिकांत गावित यांनी हटकले असता त्याने स्वत:च्या अंगावर घासलेट ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
* घटना तिसरी
स्थळ : शरणपूररोड, प्रकार : दि. 12 एप्रिल रोजी गंगापूररोड ते कॅनडा कॉर्नरच्या जोड रस्त्यालगत रात्री लघुशंका करणार्‍या दोघांना हटकल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही. एस. भालेराव यांच्या अंगावर धावून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा प्रकार घडला.
* घटना चौथी
दि. 16 फेब्रुवारी रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. डी. पवार यांनी चोपडा लॉन्ससमोर अवैध वाळू वाहतुकीचा डंपर थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कर्मचार्‍याच्या अंगावर गाडी घातली.
* घटना पाचवी
सातपूर-अंबड लिंकरोड वाहतूक शाखेचे कर्मचारी बी. एस. पवार हे वाहनांची तपासणी करीत असताना दुचाकीवरील दोघांनी कर्मचार्‍यास शिवीगाळ करीत कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला होता.


काही तासांतच मिळतो जामीन
पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण करण्याच्या घटनेत संशयितांवर संबंधित पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत असल्याने न्यायालयात अशा संशयितांना तत्काळ जामीन मिळतो.


कारवाईच्या सूचना
पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना गंभीर आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना मग्रुर रिक्षाचालक व संशयितांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. रिक्षाचालक, डंपरचालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येईल. कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त