नाशिक - लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील लाखो मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्यानंतर विविध पक्ष, संस्थांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आता मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया कडक करण्यात आली आहे. कोणतेही नाव वगळायचे असेल, तर त्याला जिल्हाधिकार्यांची मंजुरी घेऊनच मतदार यादीतून नाव वगळता येणार असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पुणे, नाशिक, मुंबई, अमरावती अशा अनेक लोकसभा मतदारसंघांतून लाखो मतदारांची नावे वगळल्याने जनतेत संताप होता. निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांनी यासंदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर आयोगाने माफीही मागितली होती. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्देशांना महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या मतदाराचा मृत्यू झाला असेल आणि त्याच्या मृत्यूचा दाखला जरी नाव वगळण्यासाठी सादर केला गेला, तरी जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीशिवाय आता हे नाव वगळता येणार नाही, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत.