आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Fake Police, Crime, Divya Marathi

तोतया पोलिस शोधण्यात अपयश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग, नाकेबंदी, सराईत गुन्हेगारांवार कारवाईचा धडाका लावला जात आहे. या कारवाईत एक-दोन गुन्हेगारांना ताब्यात घेण्यापलीकडे निष्पन्न झाले नाही. तोतया पोलिसांना पकडण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे.


शहरात सोनसाखळी चोरी, तोतया पोलिसांच्या कारवाया रोखण्याकरिता पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी तीन ठिकाणी तोतया पोलिसांनी सुमारे चार लाखांचे दागिने लुटले. यांनतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्येही पोलिसांच्या पदरी अपयश पडले. आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने श्रीरामपूर येथील एका संशयितास तोतया पोलिस असल्याच्या संशयावरून अटक केली. यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. आडगाव पोलिसांचे पथकही हातावर हात धरून बसले आहे. पूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये त्यास अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात तोतया पोलिसांना ते पकडू शकले नाहीत.


गुन्हे शोध पथके अपयशी : गुन्हे शाखेचे 1, 2 व 3 युनिट यांच्यासह 11 पोलिस ठाण्यांच्या (डीबी) पथकांकडूनही चमकदार कारवाई होत नाही. पाच ते सहा महिन्यांपासून एकही गुन्हा उघडकीस आणण्यात पथके अपयशी ठरत आहेत.


नवीन कर्मचार्‍यांवर दबाव : शहर पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांच्याही बदल्या झाल्या आहेत. नव्याने आणि प्रथमच गुन्हे शोध पथकात काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर दबाव असल्याचे निदर्शनास येत आहे.


शहरी भागात गुन्हे : तोतया पोलिसांच्या कारवाया शहरी भागात सर्वाधिक घडल्या आहेत. एकट्या आणि निर्जनस्थळी वृद्ध महिलांना टार्गेट करत सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत तोतया पोलिसांचे गुन्हे घडले आहेत.


आचारसंहितेचा धसका
गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना नाकेबंदी, कोम्बिंग ऑपरेशन व आचारसंहितेची कामे करावी लागत असल्याने या कामांचा ताण असल्याची चर्चा कर्मचार्‍यांत आहे.