आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Gudhi Padav, Model Code Of Conduct, Divya Marathi

गुढी उभारणीसाठीही आता निवडणूक आचारसंहिता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुढीपाडव्याला प्रत्येकाच्या घरावर उभारल्या जाणार्‍या गुढीतूनही कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार होणार नाही, याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने गुढीसाठीही आता आचारसंहितेची आडकाठी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, पारंपरिक पद्धतीने उभारण्यात येणार्‍या गुढींना कुठलीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.


निवडणुकीबरोबरच सण-उत्सवांचीही रेलचेल सुरू झाली आहे. मात्र, सणांच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार होणार नाही याची नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात पाडव्याला उभारण्यात येणार्‍या गुढीच्या कपड्याचा रंग हा शक्यतो भगवाच असतो, तर पाडव्याला गुढी न उभारणारा दलित समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी गुढी उभारतो. विशेष म्हणजे गुढीसाठी वापरण्यात येणारा नवीन कपडाही भगवा आणि निळ्या रंगाचाच असतो. हे दोन्ही रंग दोन राजकीय पक्षांच्या झेंड्यांचेच असल्याने आता ऐन निवडणुकीच्या आचारसंहितेत त्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, परंपरेनुसार सालाबादप्रमाणे उभारण्यात येणार्‍या गुढीप्रमाणेच ही गुढी उभारली जात असल्यास त्यास विशेष अडचण येणार नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी परवानगी न घेता ती उभारली गेल्यास विशिष्ट उमेदवाराचा प्रचार म्हणून त्यावर कारवाई केली जाईल. उमेदवाराने त्यास नकार दिल्यास गुढी उभारणार्‍यांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.


. तर कारवाई
पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यास कुठलीही अडचण नाही. मात्र, ती राजकीय स्वरूपात उभारली गेलेली नको. यंदा त्यात काही वेगळे केलेले नको. शिवाय गुढी कुठल्या उमेदवाराने प्रायोजित केलेली नसावी. सार्वजनिक ठिकाणी गुढी उभारल्यास परवानगी हवी. ती न घेतल्यास संबंधितांविरुद्ध आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाईल. विलास पाटील, जिल्हाधिकारी