आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Hording, Nitin Gadkari, MNS, Raj Thackeray

होर्डिंग्जवरदेखील भाजपचे ‘एकला चलो रे’ वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे शिवसेना-भाजप युतीत निर्माण झालेला तणाव दूर करण्यात भाजप श्रेष्ठींना काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, असे असतानाही आता नाशिकसह विविध मतदारसंघांत सेनेचा उमेदवार असताना भाजपलाच मतदान करा, अशी भव्य होर्डिंग्ज मोदींच्या छायाचित्रांसह झळकू लागल्याने यामागे नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी महायुतीत पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


एकीकडे शिवसेना-भाजप-रिपाइं आठवले गट- स्वाभिमान संघटना यांची महायुती होऊन प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाकाही सुरू झाला आहे. तर दुसरीकडे गडकरी-राज ठाकरे यांच्या भेटीने व त्यानंतर मनसेने शिवसेनेच्या उमेदवारांविरोधातच उमेदवार उभे करून निवडून येणारा प्रत्येक उमेदवार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देईल, असे जाहीर केल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली होती.


या घडामोडींनंतर शिवसेनेकडून उघडपणे नाराजी व्यक्त करत युती तोडण्यापर्यंत विचारविनिमय करण्यात आला. शिवसेनेच्या नाराजीची दखल घेत भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाने मातोश्री गाठून महायुतीत मनसेची गरज नसल्याचे सांगण्यात आले. यापाठोपाठ नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेवरही त्याचा परिणाम होऊन युतीतील संबंध दुरावल्याचे चित्र होते. त्या दिशेने भाजपच्या संघटनमंत्र्यांनी शिवसेनेच्या संपर्कमंत्र्यांना सोबत घेत दोन्ही पक्षांतील पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांचे पॅचअप केले. या घडामोडी घडून दोन दिवस उलटत नाहीत तोच भाजपकडून शहरात मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार अटलबिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्रांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या छायाचित्रांसोबत शिवसेनेच्या नेत्यांचे चित्र असायचे. तसेच काही वेळा निवडणुकांमध्ये होर्डिंग व प्रचारपत्रकांवर युतीतील घटक पक्षांचे पक्षचिन्ह असायचे. परंतु, या होर्डिंग्जवर केवळ नरेंद्र मोदींचे मोठे चित्र असून, त्यावर ‘भाजपला मतदान करा, कॉँग्रेसचे भ्रष्ट सरकार खाली खेचा’, असाच मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे.


संपूर्ण होर्डिंग्जवर कमळाचे चिन्ह असून, कुठेही महायुतीतील घटक पक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. मुळात नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसतानाही मोदींसाठी मते मागितली जात आहेत. त्यामुळे मत नेमके शिवसेना की, मनसेच्या उमेदवारीसाठी, हे स्पष्ट होत नाही. यावरून पुन्हा एकदा महायुतीत वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


राष्ट्रीय पातळीवर निश्चित
नाशिक शहरच नव्हे, तर संपूर्ण देशभरात पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे होर्डिंग्ज लावले जात आहेत. होर्डिंग्जचा नमुना राष्ट्रीय पातळीवर ठरला असावा. यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांचा समावेश नसला तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जात असल्याने त्यात काही वादाचा प्रश्न नाही. - प्रा. सुहास फरांदे, प्रवक्ता, भाजप