आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे तिकिटांवर छापण्यात आलेली शासकीय योजनांची जाहिरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. विविध माध्यमांच्या पाहणीत विद्यमान संयुक्त लोकशाही आघाडी सरकारविरोधात जनमत असल्याचे निष्कर्ष निघाल्याने आता जनाधार मिळविण्यासाठी कॉँग्रेस व मित्रपक्षांची धडपड सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आता भारतीय रेल्वेच्या तिकिटांचा आधार घेण्यात आला असून, तिकिटांच्या मागील बाजूस दिलेल्या मजकुरातून या योजनांचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे.


केंद्र सरकारने दहा वर्षात राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याच्या सूचना कॉँग्रेसतर्फे देण्यात आल्या. त्यासाठी रेल्वेच्या आरक्षण तिकिटाचा आधार घेतला गेला आहे. अशा स्वरूपाची जाहिरात छापण्याचा निर्णय दिल्लीत होतो. पैसे आकारल्याशिवाय ती छापली जात नाही. नियमानुसारच त्यासाठी परवानगी मिळते. तिकिटांच्या संख्येनुसार, दिवसांच्या हिशोबाने आकारलेल्या दरात त्यासाठी काही सूट मिळाली असावी. आचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही तिकिटे दिली जात असल्यामुळे निवडणूक संहितेचा भंग होणार नसल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.


पारंपरिक माध्यमे असूनही आक्रमण
वृत्तपत्रे, दूरदर्शन,खासगी न्यूज चॅनलचा सरकार योजनांच्या प्रसिद्धीसाठी वापर करत आहे.भाजपच्या पावलावर पाऊल ठेवून सोशल नेटवर्किंगचाही वापर सुरू झाला. ही पारंपरिक माध्यमे असूनही रेल्वे आरक्षण तिकिटावर आक्रमण करण्यात आले आहे.


तिकीट असूनही आकर्षक
आरक्षण तिकिटाच्या समोरील बाजूवर एल आकारात व मागील संपूर्ण जागेवर कल्याणकारी योजना, त्याचे स्वरूप, लाभार्थी यांची सविस्तर महिती आहे. पंतप्रधान ग्रामसडक, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन, राजीव गांधी आरोग्य, इंदिरा आवास घरकुल, मनेरगा, अन्न सुरक्षा या योजनांबाबत प्रवाशांना पटकन समजेल अशा भाषेत, आकर्षक शब्द रचना करण्यात आली आहे.