आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, JEE Mains, Online Mock Test, Divya Marathi

‘जेईई मेन्स’साठी मेक्टाची ऑनलाइन मॉक टेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जेईई मेन्स परीक्षेचा सराव करून घेण्यासाठी महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज टीचर्स असोसिएशन (मेक्टा)तर्फे रविवारी (दि. 16) सकाळी 11 ते 2 या वेळेत पहिली मॉक टेस्ट (सराव परीक्षा) घेण्यात आली. 360 गुणांसाठी झालेल्या या ऑनलाइन परीक्षेस जिल्ह्यातून 300, तर राज्यभरातून 1200 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, परीक्षेच्याच दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत निकालही जाहीर झाले.


अभियांत्रिकी प्रवेशासाठी शासनाने राष्ट्रीय स्तरावर जेईई (जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) अनिवार्य केली आहे. ही परीक्षा 6 एप्रिल रोजी होणार आहे. परीक्षेच्या सरावासाठी मेक्टाच्या वतीने राज्यभर विद्यार्थ्यांचा तीन मॉक टेस्टद्वारे सराव करून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जेईईच्या धाटणीचेच प्रश्न विचारले जाणार असून, त्यांची उत्तरे कशी लिहायची, याचा सराव होण्यात यातून मदत झाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे यापूर्वीच मेक्टाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या पहिल्याच मॉक टेस्टबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. 16 रोजी झालेली आणि 23 व 30 मार्च रोजी होणार्‍या अशा एकूण तीन मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यांचे ऑनलाइन अर्जही 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आले होते. राज्यातून एक हजार 700 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.


1203 निकाल जाहीर : 380 गुणांसाठी झालेल्या या सराव परीक्षेचा निकाल सायंकाळी जाहीर झाला. 1203 जणांचे निकाल जाहीर झाले. त्यात औरंगाबाद येथील एन. व्ही. भार्गवी ही विद्यार्थिनी 230 गुण प्राप्त करून प्रथम आली. 14 विद्यार्थ्यांनी 200हून अधिक गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक पटकावला. 100हून अधिक विद्यार्थ्यांनी 179 गुण मिळविले. 34 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असल्याने एका विद्यार्थ्याला उणे 13 गुण मिळाले.


जिल्ह्यात सहा केंद्रांवर झाली परीक्षा
राज्यातील 50, तर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर ही परीक्षा झाली. क. का. वाघ अभियांत्रिकी, मविप्र अभियांत्रिकी, मातोश्री अभियांत्रिकी, भुजबळ नॉलेज सिटी याव्यतिरिक्त चांदवड व मालेगाव येथे परीक्षा झाली.

संकेतस्थळावर निकाल
परीक्षेच्याच दिवशी निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेला पासवर्ड मेक्टाच्या संकेतस्थळावर टाकल्यास त्यांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळतील. कुठलीही अडचण आल्यास www.mecta.in या संकेतस्थळास विद्यार्थ्यांनी भेट द्यावी. प्रा. गजानन खराटे, डीन, अभियांत्रिकी शाखा