आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, KBC Director, Money Fraud

जादा व्याजाचे आमिष दाखविल्याप्रकरणी ‘केबीसी’ संचालकांचा पोलिसांकडून शोध सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सामान्य गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा व्याजाचे आमिष दाखविल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ‘केबीसी’चे संशयित व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व भारती चव्हाण यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध सुरूकेला आहे. त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शोध पथकाकडून ‘केबीसी’च्या राज्यभरातील मालमत्तांची आणि प्रसंगी एजंटांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


औरंगाबाद, जालना, बीड, नांदेडसह खान्देशातील शेकडो गुंतवणूकदारांना गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळ्या योजनांद्वारे झटपट र्शीमंत होण्याचे आमिष दाखविणार्‍या ‘केबीसी’ कंपनीविरोधात पोलिसांनीच पुढाकार घेत गुन्हा दाखल केला. कंपनीचे मुख्यालय असलेल्या नाशकातील आडगाव शिवारात महामार्गावरच असलेल्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. आर्थिक गुन्हे शोध पथकाचे सहायक आयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक
चांदखेडे यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्याचबरोबर कार्यालयातून 4 कोटी 66 लाखांची रक्कम, गोणी भरून हार्ड डिस्क, लॅपटॉप जप्त करण्यात आले. कार्यालयातील व्यवस्थापक बापूसाहेब चव्हाण यांना अटक करण्यात आली.
सहायक निरीक्षक एस. एस. जाधव यांच्या तक्रारीनुसार कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब चव्हाण व भारती चव्हाण आणि बापू चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील बापू चव्हाण यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, जामीन मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी पोलिसांकडून न्यायालयात या कंपनीकडून नियमबाह्य रीतीने कोट्यवधींची गुंतवणूक योजना राबविली जात असून, त्याचा शोध घेण्यासाठी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.


संलग्न कंपन्यांच्या चौकशीची राष्ट्रवादीची मागणी
‘केबीसी’चे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच या कंपनीशी संलग्न नाशकात चार आणि मुंबई येथे वेगवेगळ्या नावाने आणखी कंपन्या उघडल्याची माहिती रजिस्टर नोंदणीद्वारे समोर आली आहे. चव्हाण दांपत्य सिंगापूर येथे स्थायिक झाले असून, त्यांच्या नावे असलेली व कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची आणि त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदनात करण्यात आली आहे. आडगावचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांना विभागीय अध्यक्ष देवांग जानी, धीरज मगर, किरण पानकर, बंटी कोरडे, शरद लभडे, नीलेश पाराशेरे, युवराज पेखळे, र्शेयश सराफ, दीपक फलटणे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

या आहेत संलग्न कंपन्या
डीबीसी मल्टिलेव्हल मार्केटिंग (इं) प्रा. लि. कृष्णनगर,
केबीसी मल्टिट्रेड प्रा. लि., लामखेडे मळा, मेरी,
केबीसी प्लॉटर्स, र्शीरामनगर पंचवटी,
केबीसी क्लब रिसॉर्ट प्रा.लि. आडगाव
एफएक्स रिच बुलियन फायनान्शियल सर्व्हिस प्रा.लि. डोंबिवली इस्ट.


एजंटांच्या मालमत्तेचीही चौकशी
पोलिसांकडून ‘केबीसी’मार्फत फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. त्यापाठोपाठ कारवाई करीत पाच कोटींची रोकड जप्त केली असून, ही रक्कम कुठून आणली, कोणाकडून आणि कशासाठी जमा केली, याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, भाऊसाहेब चव्हाण व भारती चव्हाण यांचा दोन दिवसांपासून ठावठिकाणा मिळालेला नाही. त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे निरीक्षक चांदगुडे यांनी सांगितले.