आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Land Acquisition, Thermal Electricity Project, Divya Marathi

बागायतीला एकरी 35, तर जिरायतीला 17.50 लाखांचा मोबदला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - गुळवंच शिवारातील औष्णिक वीज प्रकल्पासाठी उभारण्यात येणार्‍या रेल्वे मार्गासाठी तालुक्यातील गुळवंच, बारागावपिंप्री आणि पाटपिंप्री या तीन गावांतील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुमारे 300 शेतकर्‍यांचे करारनामे पूर्ण झाले असून, अल्पावधीतच नुकसानभरपाईची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल. बागायती जमिनीसाठी एकरी 35 लाख, तर जिरायतीसाठी 17.50 लाख रुपये दराप्रमाणे शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळणार आहे.


संपादित जमीन मोबदल्यासाठी शासनाकडून जिल्हाधिकार्‍यांच्या नावे 65 कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. औष्णिक प्रकल्पासाठी कोळसा वाहून आणण्यासाठी एकलहरे ते गुळवंच असा रेल्वेमार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठी एकलहरे, हिंगणवेढे, जाखोरी, जोगलटेंभी, नायगाव, पिंपळगाव निपाणी, देशवंडी पाटपिंप्री, बारागावपिंप्री, गुळवंच येथील सुमारे 180.60 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. यातील काही गावांतील शेतकर्‍यांनी विरोध दर्शवल्याने भूसंपादन प्रक्रिया ठप्प झाली होती. ज्या शेतकर्‍यांनी भूसंपादनास संमती दर्शवली त्यांचे करारनामे करून घेण्यात आले आहेत. गुळवंच, बारागावपिंप्री, पाटपिंप्री या गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. करारनामे पूर्ण झालेल्या शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकर्‍यांना बुधवारी सिन्नर तहसील कार्यालयात बोलावण्यात आले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ आणि निफाड उपविभागीय कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन केले.

संमतीसाठी मनधरणी
सातबारा उतार्‍यावर एकापेक्षा अधिक शेतकर्‍यांची नावे असल्यामुळे नुकसानभरपाईची मिळणारी रक्कम हिश्श्याप्रमाणे वाटप होणे आवश्यक आहे. मात्र, बहुतेक शेतकरी स्वत:च मूळ मालक असल्याचे सांगून रक्कम आपल्याच बॅँक खात्यावर जमा करा, असा आग्रह अधिकार्‍यांकडे धरत होते. त्यावर उर्वरित शेतकर्‍यांचे संमतीपत्र असल्याशिवाय ते शक्य नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगताच ‘त्या’ शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आठय़ा उमटत होत्या. अनेक सातबारा उतार्‍यावर इतर अधिकारात बहिणींची नावे असल्याने नुकसान भरपाईपोटी मिळणार्‍या रकमेमुळे नात्यात कटूता येण्याचीही चर्चा होती.

कागदपत्रांची पूर्तता करावी
करारनामे पूर्ण झालेल्या शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाकडून रक्कम प्राप्त झाली आहे. नोटिसा मिळालेल्या शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास आरटीजीएस पद्धतीने बॅँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल.
डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय अधिकारी, निफाड


180 हेक्टर क्षेत्र होणार संपादित
एकलहरे- 13.44, हिंगणवेढे- 13.57, जाखोरी- 12.56, जोगलटेंभी- 3.71, नायगाव- 44.98, पिंपळगाव निपाणी- 3.77, देशवंडी- 25.46, पाटपिंप्री- 11.11, गुळवंच- 28.57, बारागावपिंप्री- 23.43 या दहा गावांचे मिळून 180.60 हेक्टर क्षेत्र रेल्वे मार्गासाठी संपादित केले जाणार आहे. बहुतेक गावांतील शेतकर्‍यांनी संमती दर्शविल्याने रेल्वे मार्गाचा अडथळा दूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.