आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, LBT, Traders, Nashik Municipal Corporation

एलबीटीसंदर्भात व्यापारी 19 मार्चला ठरवणार ‘रणनीती’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘एलबीटी नको अन् जकात करही’ अशी भूमिका घेत राज्यभर आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांची निवडणूक ‘रणनीती’ आठवडाभरात निश्चित होणार आहे. यासाठी 19 मार्चला स्थानिक स्वराज्य संस्था कर लागू असलेल्या 26 महापालिकांतील व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक होत आहे. एलबीटी रद्द न केल्यास सरकारचा बाजार उठवू म्हणणार्‍या व कर रद्द न केल्यास सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखवण्याच्या आणाभाका घेणार्‍या व्यापार्‍यांच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचेही लक्ष लागून आहे.


व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार, एलबीटी करातून केवळ वसुलीच केली जात आहे. शासनाच्याच मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासत दुकानांची झडती घेणे, गाड्या अडविणे असे प्रकार राज्यभर होत असून, याविरोधात सोलापूर, कोल्हापूर येथे बंद पाळण्यात आला. येथे व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल झाले असून, हीच स्थिती राज्यभरात होणार असल्याने हा कर रद्द करावा, अशी मागणी दीड वर्षापासून करण्यात येत आहे. 21 फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या इशारा सभेत व्यापार्‍यांच्या मागणीला पाठिंबा देणार्‍या पक्षांच्या उमेदवारांनाच विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार असल्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र, हा इशारा सरकारने गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे एलबीटी रद्द करण्याबाबत पाठिंबापत्र देणार्‍या पक्षांनाच व्यापारी मतदान करणार का? अशी उत्सकुता आहे.


.तर नाशकात हे चित्र
व्यापार्‍यांनी सत्ताधारी आघाडीला मते न देण्याचा निर्णय घेतला, तर नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना फटका बसू शकेल, तसेच मागणीला पाठिंबा देणारे ‘आप’चे उमेदवार विजय पांढरे किंवा शिवसेना-भाजप महायुतीचे हेमंत गोडसे यापैकी कोणाला व्यापारी पाठिंबा देणार, याची चर्चा सुरू आहे. ‘एलबीटी’विरोधी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पिंपरी- चिंचवड येथील व्यापारी महासंघाचे नेते खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेची वाट धरली आहे. त्यामुळे हा पाठिंबा प्रदीप पवारांना मिळेल का, याबाबत गणिते मांडली जात आहेत.