आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Loadshedding, Divya Marathi

शहरातील भारनियमन होणार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या आठवड्यात बंद पडलेले वीज निर्मितीचे संच पूर्ववत सुरू झाल्याने शहरासह परिसरात सुरू झालेले अघोषित भारनियमन आता पूर्णपणे बंद झाले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून शहरात 3 ते 6 तास इतके भारनियमन सुरू झाले होते.
मागील आठवड्यात राज्यातील विविध ठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद पडले होते. त्यात अदानी 1320 मेगावॉट, इंडिया बुल्स 500 मेगावॉट, जेएसडब्ल्यू 600 मेगावॉट आणि केंद्रीय प्रकल्पातील 500 मेगावॉटचे संच बंद पडल्याने राज्याला तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे भारनियमनाचे संकट ओढावल्याने नाशिक आणि परिसरात जवळपास 3 ते 6 तास इतक्या मोठय़ा प्रमाणावर भारनियमनाला तोंड द्यावे लागले होते. नागरिकांकडूनही त्यासंदर्भात रोष व्यक्त केला जात होता. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्वच वीज निर्मितीची केंद्रे सुरू झाल्याने तूट कमी होऊन भारनियमन रद्द झाले आहे. दिल्ली पॉवर एक्स्चेंजकडूनही टप्प्याटप्प्याने 1200 मेगावॉट वीज आपत्कालीन वीज खरेदीद्वारे घेण्यात आली होती.

रात्रंदिवस केली कामे : मागील आठवड्यात वादळी वारा व पावसामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले. देवळाली कॅम्प, सातपूर, सिडको, जुने नाशिक, गोविंदनगर, पंचवटी, भगूर, गंगापूर, आडगाव, सामनगाव, शिंदे, पळसे, गिरणारे, हरसूल, कोणे आदी भागात शेकडो विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. यामुळे शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. यासंदर्भात मुख्य अभियंता के. व्ही. अजनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस दुरुस्तीचे काम केले. ग्रामीण भागातील अधीक्षक अभियंता प्रशांत नेवासकर, अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनीही विविध कामांवर लक्ष ठेवले.

जिल्ह्यात 2257 वीज खांब जमीनदोस्त
सततच्या गारपिटीमुळे व सोसाट्याच्या वार्‍यामुळे महावितरणचे जवळपास 4.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले. नाशिक परिमंडळात 3100 विजेचे खांब जमीनदोस्त झाले. त्यापैकी 2257 खांब नाशिक जिल्ह्यात पडले आहेत.

इतर ठिकाणी दुरुस्ती सुरू
वीज निर्मितीचे सर्व संच सुरू झाल्याने शहरातील भारनियमन बंद झाले आहे; मात्र पुणे, सातारा, सांगली या भागातील विजेचे टॉवर्स दुरुस्त न झाल्याने या ठिकाणी भारनियमन काही प्रमाणात सुरूआहे. राम दुतोंडे, मुख्य महाव्यवस्थापक, जनसंपर्क महावितरण