आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

जयंती, पुण्यतिथी उमेदवारांच्या पथ्यावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एरवी अनेक वेळा महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी अनेक पक्षांच्या आणि नेत्यांच्या विस्मरणात असते. पण, आता झाडून सगळ्याच राष्ट्रीय पुरुषांसह, स्वामी, महाराज यांचेही स्मरण उमेदवार करत अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. यामुळे मात्र कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ होत आहे. यानिमित्ताने होणारे कार्यक्रम उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या चांगलेच पथ्यावर आहेत.


निवडणुकीच्या धामधुमीतच राष्ट्रीय पुरुषांची जयंती, पुण्यतिथी येत आहेत. हा उत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांचे पावती पुस्तक प्रत्येक उमेदवारांकडे फिरत असून, उमेदवारही त्यांना काहीही न विचारता सढळ हाताने मदत करतानाच ‘लक्ष राहू द्या’ असं आवतन देत आहेत.


आचारसंहिता असूनही शिवजयंती मात्र विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जल्लोषात साजरी केली. आपल्या प्रचारात कार्यकर्त्यांचा सहभाग असावा यासाठी उमेदवारानेही या जल्लोषासाठी हात मोकळा केला होता, हे वेगळे सांगायला नको. या उत्सवात सर्वच पक्षाचे उमेदवार, नेते एकत्र आलेले दिसले. 1 एप्रिल रोजी अक्कलकोटच्या श्री स्वामी सर्मथांच्या जयंतीलाही हाच अनुभव आला. ज्येष्ठ नागरिकांना मुक्तहस्ते निधी मिळाल्याने हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा झाला. एका उमेदवाराने खास केंद्रात येऊन हजेरीदेखील लावली. जणू काही निवडूनच आल्याच्या आर्विभावात काही अडचण आहे का? पाणी वगैरे मिळते ना व्यवस्थित? काही समस्या असल्यास केव्हाही फोन करा, असे आश्वासन देऊन हे महाशय निघून गेले. हाच अनुभव पदयात्रा करणारे साई भक्तही घेत आहेत.
श्रीरामनवमीलाही उमेदवारांनी राम मंदिरात रामाचे दर्शन घेण्याबरोबरच मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तर नुकतीच झालेली महात्मा फुले यांची जयंतीदेखील मोठय़ा उत्साहात साजरी झाली. त्यासाठी या उमेदवारांनी कार्यकर्त्यांना, त्यांच्या मंडळांना मदतही केली होती.


आता घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीलाही हेच बघायला मिळणार आहे. ठिकठिकाणी सुरू असलेली तयारी ही त्याचेच द्योतक आहे. मोठमोठे होर्डिंग्ज, त्यावर नेतृत्व करणार्‍यांच्या छबी झळकविण्यात येत असल्याने कार्यकर्तेही कमालीचे खूश आहेत. त्यांना दरवर्षीप्रमाणे यंदा वर्गणीसाठी झटण्याची गरज नाही. या उत्सवातही उमेदवारांची हजेरी लागल्याशिवाय प्रचार पूर्ण झाल्याचे समाधान त्यांना मिळणार नाही.