आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Maharashtra State Transport Corporation, Examination

परीक्षेपूर्वीच उमेदवारांची एसटीकडून ‘परीक्षा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 3 हजार 683 वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी रविवारी झालेली परीक्षा महामंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे उमेदवारांसाठी ‘परीक्षेपूर्वीची परीक्षा’ ठरली. या परीक्षेसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांच्या प्रवेशपत्रांवर केंद्रांचे नाव व पत्ता यात तफावत आढळून आल्याने ऐनवेळी उमेदवारांची फरफट झाली. तर, काही उमेदवारांना परीक्षा केंद्रांची शोधाशोध करावी लागल्याने त्यांना विलंब झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, प्रादेशिक परिवहन विभागाच्या लिपिक पदासाठीच्या उमेदवारांमध्येही परीक्षा केंद्राबाबत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.


महामंडळाने अनुशेष व आरक्षणानुसार वर्ग एक, दोन व तीनच्या 3 हजार 683 विविध रिक्त जागांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. पुण्यातील चाणक्य मंडळाच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. नाशिक, मुंबई, औरंगाबादसह राज्यातील नऊ जिल्ह्यांच्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात आली. नाशिक शहरात परीक्षेसाठी एकूण 23 केंद्रे निश्चित करण्यात आले होते. सुमारे पाच हजारांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली.


गोंधळाची पुनरावृत्ती : एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन वेगवेगळ्या शहरांतील केंद्र देण्यात आल्याची चूक आठवडाभरापूर्वीच महामंडळाच्या लक्षात आली होती. त्यानुसार, संकेतस्थळावर चुकांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, परीक्षेच्या दिवशी त्यातील चुकांची पुनरावृत्तीच झाली.
या पदांसाठी झाली परीक्षा : मुख्य वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ प्रक्रिया योजना अधिकारी, विभागीय वाहतूक /आगार व्यवस्थापक- यंत्र अभियंता, लेखाधिकारी, कामगार अधिकारी, विधी अधिकारी, वास्तुशास्त्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, सुरक्षा व दक्षता अधिकारी, वाहतूक निरीक्षक आदी.


मनस्ताप झाला
प्रवेशपत्रावर के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज, सरस्वतीनगर असा पत्ता होता. प्रत्यक्षात पत्त्यावरील कॉलेज हे अँग्रिकल्चर आहे व इंजिनिअरिंग कॉलेज अमृतधामनजीक असल्याचे नंतर उमगले. केंद्राच्या शोधात मनस्ताप सहन करावा लागला. कैलास सोनवणे, परीक्षार्थी उमेदवार


आरटीओच्या लिपिक पदासाठी परीक्षा
प्रादेशिक परिवहन विभागाच्या 13 कनिष्ठ लिपिक पदासाठी शहरातील 14 केंद्रांवर एमकेसीएलमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. सकाळी 9.30 ते 11 व दुपारी 12 ते 1.30 या दोन सत्रांत परीक्षा झाली. 600 उमेदवार परीक्षेसाठी बसले होते. भोसला महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय, बिटको, सातपूर येथे केंद्र होते. या केंद्रांवर परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी भेटी देत पाहणी केली.

उमेदवारांची फरफट
काही उमेदवारांचे परीक्षा केंद्र व त्याचा पत्ता यात तफावत असल्याने एका केंद्रावरून दुसर्‍या केंद्राचा शोध घेताना उमेदवारांची नाहक फरफट झाली. परिणामी, अनेक उमेदवार पेपर सुरू झाल्याच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा केंद्रावर पोहोचले. केटीएचएमच्या आवारातील डीएड, फार्मसी अशी विविध दहा, तर आडगाव मेडिकल कॉलेज, के. के. वाघ महाविद्यालय, भोसला महाविद्यालय अशी केंद्रे होती. प्रवेशपत्रावर के. के. वाघ महाविद्यालय मात्र प्रत्यक्षात परीक्षा कृषी महाविद्यालयात असा गोंधळ निर्माण झाला होता. एसटीच्या स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी परीक्षेबाबत अनभिज्ञता दर्शविली. जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनीही महामंडळाकडे विचारणा करा, असे सांगत हात वर केले.