आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे दोन चित्रपट शुक्रवारी पडद्यावर झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दादासाहेब फाळकेंची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील स्थानिक कलाकार आता चित्रपटक्षेत्रात वेगाने घोडदौड करताहेत असे नव्हे तर, निर्माते आणि दिग्दर्शकदेखील हिरिरीने त्यात उतरायला लागले आहेत. त्यामुळेच मुंबईच्या बरोबरीने येत्या 28 फेब्रुवारीला नाशिकचे तब्बल दोन मराठी चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहेत. नाशिकमध्ये रुजू पाहणार्‍या चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.


सचिन शिंदे दिग्दर्शित, दत्ता पाटील यांची कथा-पटकथा व संवाद लेखन असलेला ‘महागुरू’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. नाशिकच्याच संजय भुतडा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या जोडीला नाशिकच्याच संचेती ग्रुपचे राजेंद्र संचेती यांची निर्मिती असलेला ‘घुंगराच्या नादात’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही नाशिकच्याच आनंद बच्छाव यांचे आहे.


महागुरू चित्रपटात उपेंद्र लिमये, कुलदीप पवार, अजिंक्य देव, उदय सबनीस, सुनील तावडे, भार्गवी चिरमुले, स्मिता तांबे या बड्या स्टारकास्टसोबत नाशिकचे निवास मोरे, ज्ञानेश्वर वाघ, आनंद बापट, बालकलाकार ओवी दीक्षित, मुळचे नाशिकचे पण सध्या मुंबईत स्थित असलेले दीपक करंजीकर आदींच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शंकर महादेवन आणि निहीरा जोशी यांनी चित्रपटाची गाणी गायली आहेत. नाशिक आणि मुंबईमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे संगीतही नाशिकच्याच संजय गिते यांनी दिले आहे. घुंगराच्या नादात या चित्रपटातील अनेक कलाकार हे नाशिकचेच आहेत. लावणीवर आधारित एका सत्यघटनेवर हा चित्रपट असून पुजा राज, युगंधरा, निकिता आदी नाशिकच्याच कलाकारांसह दीपाली सय्यद, निशा परुळेकर, संजय खापरे, अनंत जोग, प्रेमा किरण या मुंबईच्या कलाकारांबरोबर भूमिका आहेत. संजय खापरे या चित्रपटात रावसाहेब ही एक विशेष भूमिका साकारत आहेत. चित्रपटास नंदू होनप यांनी संगीत दिले आहे.


चित्रपटाकडून चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा
बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘महागुरू’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे चित्रपटाला नाशिकसह सर्वत्र चांगलाच प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. - दत्ता पाटील, चित्रपटाचे लेखक


घुंगराच्या नादातसाठी अनोखा प्रयोग
लावणी अनेकदा फडामध्ये म्हणजे तंबूत वा अलीकडे स्टेजवर चित्रित होते. मात्र, घुंगराच्या नादात या चित्रपटामध्ये निसर्गरम्य स्थळी एक लावणी चित्रित करण्यात आली आहे. लावणीच्या दृष्टीने हा वेगळा प्रयोग चित्रपटात केला गेला आहे.