आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरा वर्षांनी लग्नाच्या दिवशी भेटला भाऊराया, लग्नातील हृदयस्पर्शी गोष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भावापासून दूर राहिलेल्या बहिणीला तब्बल अठरा वर्षांनी आणि तेही ऐन लग्नाच्या दिवशीच भाऊ भेटल्याची घटना येथे घडली अन् भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा प्रत्यंतर पुन्हा एकदा आला. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भावाला पाहिल्याने त्याच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून देणार्‍या बहिणीला पाहून अवघ्या वर्‍हाडी मंडळींनाही अर्शू लपविता आले नाही.


मूळची जालना येथील, परंतु हल्ली नाशिक येथे राहणार्‍या सपनाला तिच्या विवाहाच्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी तिचा अठरा वर्षांपासून दूर राहिलेला भाऊ गोरख भेटला. दोन महिन्यांची असतानाच सपनाची आई संगीता यांचे निधन झाले होते. त्यानंतर वडील कल्याण धात्रक यांचेही छत्र हरपले. तिच्या आजोळच्या मंडळींनी गोरखला स्वत:कडे ठेवले. सपनाचा सांभाळ कोणी करायचा, म्हणून प्रत्येक जण त्यावेळी एकमेकांचे नाव पुढे करायचा. परंतु, तिचे मामा व मावशी रंजना कैलास धात्रक यांनी तिला कुशीत घालून नाशिकला आणत आपल्या इतर मुलांबरोबर तिचेही संगोपन सुरू केले. एवढय़ा लहानशा मुलीचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेत संपूर्ण कुटुंब होते. अशावेळी सपनाची मामी सुनीता नाना भडांगे यांनी सपनाच्याच वयाच्या असलेल्या आपल्या मुलीबरोबर तिचाही सांभाळ सुरू ठेवला. अनेक प्रसंगी तर स्वत:च्या मुलीला स्तनपान करत असताना सपना रडायला लागली की तिला बाजूला ठेवून सपनाला त्या स्तनपान करायच्या. काही दिवसांनंतर सपनाला माहिती पडले की या जगात आपला एक भाऊदेखील आहे; मात्र यावर तिचा विश्वास बसत नव्हता. कारण मावशीने तिला कधीही काही कमी पडू दिले नाही. मावसभाऊ तिला अगदी सख्ख्या भावासारखेच जीव लावत होते. धुणीभांडी आणि इतर घरकामे करून मावशीने आपल्या मुलांबरोबर सपनालाही शिक्षण दिले. शाळेत टाकताना मावशीने सपनाला स्वत:चे नाव देऊन एक हक्काची ओळख निर्माण करून दिली. तिन्ही मुलांचे आणि मुलीचे लग्न झाल्यानंतर मावशी संगीता यांनी सपनाचे लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासरशी तिला स्थळ पाहणे सुरू झाले. हे सर्व घडत असताना सपनाला आपल्या भावाची आठवण होत होती. लग्न ठरले. लग्नाचा एक-एक दिवस जवळ येत होता, तशी तिच्या मनातील भावाची आस तिला स्वस्त बसू देईना. अखेर तिने मामा आणि मावशीकडे भावाला एकदा तरी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नातेवाइकांनी जालना येथे संपर्क साधून सपनाच्या भावाची विचारपूस सुरू केली. अखेर तिचा भाऊ गोरख हा त्याच्या आत्याकडे जालना येथे राहत असल्याचे समजले. बहिणीविषयी माहिती मिळताच तो 18 फेब्रुवारीला लगबगीने नाशिककडे निघाला. गोपाळ भडांगे यांनी ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली.


एकदा तरी भेटावा हीच इच्छा
भाऊ आहे हे समजताच त्याने आयुष्यात एकदा तरी भेटावे असे वाटत होते. देवावर र्शद्धा होती. तो भेटेलच असा विश्वास होता. माझ्या लग्नात भाऊ भेटल्याने तेच माझ्यासाठी सर्वात मोठे कन्यादान होते. मावशीने मुलीसारखं वाढवल्यानेच आज जग पाहते आहे. सपना धात्रक (बोडके)


आता इकडेच यायचंय
बहीण मिळाल्याने आता दुसरी काहीच अपेक्षा राहिली नाही. आता इकडे तिच्याकडेच कायमस्वरूपी राहायला यायचे आहे. - गोरख धात्रक, जालना


दोन दिवस 18 वर्षांसारखे
लग्नाच्या दोन दिवस आधी भावाशी बोलणे झाल्याने भाऊ कधी भेटतोय, या विचाराने सपनाला दोन दिवस 18 वर्षांसारखेच झाले होते. अखेर तो दिवस उजाडला. एकीकडे अंगाला हळद लागत असताना दुसरीकडे सपना भावाची प्रतीक्षा करीत होती. लग्नाच्या दिवशी सकाळी 9 वाजता गोरख आल्याचे समजताच धावत जाऊन सपना त्याच्या गळ्यात पडली. 18 वर्षांनंतर भावा-बहिणीचे मिलन बघून उपस्थित वर्‍हाडी मंडळींच्या डोळ्यांच्या कडाही आनंदाश्रूंनी पाणावल्या.


तिला एकटीला कुठे सोडू?
आई-वडील हरपल्याने दोन महिन्यांच्या तान्हुलीचे करायचे काय, या विचाराने माझे काळीज कापून निघाले होते. आपल्या इतर मुलांप्रमाणे तिलाही वाढविता येईल. बहिणीचीच मुलगी असली तरी मी तिला माझ्या मुलाप्रमाणे आजवर माया लावली आणि यापुढेही लावणार. - रंजना कैलास धात्रक, क्रांतीनगर