आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Model Code Of Conduct, Lok Sabha Election, Divya Marathi

आचारसंहितेच्या निर्देशबाबत बँका अद्याप अनभिज्ञ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणूक काळात आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी दहा लाख रुपयांवरील व्यवहाराची माहिती देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत. मात्र, अद्याप ते निर्देश बँकांना पोहोचले नसल्याने मुक्त बँकिंग कारभार सुरू आहे.
5 मार्चपासून लागू झालेल्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीही दाखल होऊ लागल्या आहेत. बँकिंग व्यवहारांवरही निवडणूक आयोग करडी नजर ठेवणार आहे, मात्र आचारसंहिता काळातील जबाबदारी पोहोचली नसल्याने बँका या निर्णयाबाबत अनभिज्ञ आहेत. जिल्हाधिकार्‍यांकडून हे आदेश बँकांना पाठविले जाण्याची किंवा तत्काळ बैठक घेण्याची गरज बँकर्सकडून व्यक्त होत आहे.
आचारसंहितेत या सूचना
निवडणूक कामासाठी वापरण्यात येणार्‍या आरटीईजीद्वारे एका बँक खात्यातून दुसर्‍या खात्यात रक्कम वळती झाल्यास त्याची माहिती सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांना नियमित अथवा व्यवहार झाल्याबरोबर तत्काळ निवडणूक विभागाच्या ‘खर्च विभागा’ला द्यावी लागणार आहे. उमेदवार, त्याची पत्नी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या खात्यातून एक लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च झाली किंवा जमा झाल्यास त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे.
लवकरच संयुक्त बैठक
बँकांना या आदेशाबाबत माहिती व्हावी, तसेच आर्थिक व्यवहारांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.
नियम माहिती नाही
या प्रकारच्या नियमांबाबतची माहिती निवडणूक विभागाकडून मिळालेली नाही. पण ती कोणत्याही क्षणी प्राप्त होऊ शकते. कारण, महिनाभरापूर्वी झालेल्या एका बैठकीत उमेदवारांचे खाते उघडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. बी. एन. साळुंके, विभागीय व्यवस्थापक, जळगाव जनता बँक
एटीएममधील भरण्यावरही ‘वॉच’
बँकांना एटीएम रिचार्ज करण्यासाठी रोकड घेऊन जाणार्‍या गाडीसोबतच्या व्यक्तींची माहिती गाडीसमवेत असणे आणि एटीएममध्ये भरण्यात येणार्‍या रकमेची माहितीही सोबत ठेवावी लागेल. कारण आयोगाच्या अधिकार्‍यांकडून गाडीची कधीही झडती घेतली जाऊ शकते.
अद्याप आदेश नाहीत
बँकिंग व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवण्याबाबत काहीही आदेश आमच्यापर्यंत आले नसून, या प्रकारच्या तरतुदीबाबत माहिती नाही. निवडणूक शाखेकडून याबाबतची माहिती घेतली जाईल. बाबुलाल बंब, क्षेत्रीय महाव्यवस्थापक, स्टेट बँक