आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Nashik Municipal Corporation Various Committee Selection

स्थायीची फील्डिंग लोकसभेसाठी डोकेदुखी, इच्छुकांची वाढली संख्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पालिका स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अडचणीची ठरण्याची भीती व्यक्त होत असून, इच्छुकांची वाढती संख्या व संभाव्य राजी-नाराजीचा फटका टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
28 फेब्रुवारीला आठ सदस्य निवृत्त होत आहेत. नव्या नियुक्तीसाठी महापौर यतिन वाघ यांनी गटनेत्यांकडून यादी मागवली आहे. सर्वाधिक रिक्त जागा शिवसेनेकडे असून, आठ इच्छुकांची भाऊगर्दी आहे.

सलग दोन वर्षे स्थायी सभापतीपदासाठी दावेदार राहिलेल्या मनसेच्या अशोक मुर्तडक यांची जागा रिक्त होत असून, गेल्या वेळी ‘एक सदस्य-एक वर्ष’ असा आमदार वसंत गिते यांचा फॉर्म्युला मुर्तडक यांच्यामुळे रद्द झाल्याने त्याचा फायदा सुदाम कोंबडे यांना होतो की नाही, असाही प्रश्न आहे. तसे झाल्यास मनसेची एकच जागा रिक्त होईल; अन्यथा कोंबडे यांना पुन्हा संधी मिळेल. अपक्षांच्या गटाचे पाच सदस्य असून, आवर्तन पद्धतीने त्यांच्यातील एक सदस्य निवृत्त होणे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसच्या कोट्यातील एकमेव जागा रिक्त होत असून, नवनियुक्त शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी पक्षप्रभारी भाई जगताप यांच्या कोर्टात चेंडू टोलवल्याचे सोंगितले जाते. भाजपचे दोन सदस्य निवृत्त होत असून, येथेही इच्छुकांची संख्या मोठी आहे.


राष्ट्रवादीकडून राजीनामे
राष्ट्रवादीचे सुनीता निमसे, हरीश भडांगे, कल्पना चुंभळे हे सदस्य असून, त्यांच्या जागी एक वर्षाच्या कालावधीसाठी नवीन सदस्य देण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणाला संधी द्यावी व कोणाला नाकारावी, असा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर आहे.


हे सदस्य होणार निवृत्त
शिवसेना : शिवाजी सहाणे, सूर्यकांत लवटे, प्रकाश लोंढे, भाजप : बाळासाहेब सानप, सीमा हिरे, मनसे : अशोक मुर्तडक, काँग्रेस अश्विनी बोरस्ते, अपक्ष : शबाना पठाण