आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Nashik Municipal Corporation Waste Crores On Garbage

नाशिक महापालिकेची कोट्यवधी रुपये जातात ‘कच-यात’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकची आरोग्यव्यवस्था मध्यंतरी ढासळल्यावर महापौर यतिन वाघ यांनी पाहणी दौरे सुरू केले. त्यांच्या प्रभागातही कच-याचे ढीग, अस्वच्छता दिसल्यानंतर सफाई कर्मचारी आणि महापौर असे थेट हातापाईपर्यंतचे प्रकरणही गाजले. त्यानंतरही आरोग्य व्यवस्था जैसे थे राहिली. किंबहुना मतांच्या राजकारणात आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. घंटागाडीच्या माध्यमातून रोज गोळा होणा-या कच-यावर पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पात प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्माण केले जाते. परंतु, कच-याचे प्रमाण प्रचंड असल्याने तेवढ्या प्रमाणात ना कचरा संकलित होतो, ना प्रक्रिया होते. स्वच्छतेवर पालिका वर्षाला तब्बल 12 कोटी रुपये खर्च करते. शहरात रोज निर्माण होणा-या 390 टन कचरा संकलनासाठी पालिकेकडे 2000 कर्मचारी, तर 170 घंटागाड्या आहेत. त्यातील 350 ते 360 टन कचरा संकलित होतो, तर रोज 30 टन कचरा पडून राहतो. पालिकेच्या पर्यावरण अहवाल 2012 मध्ये हे उघड झाल्यावरदेखील दोन वर्षानंतरही पावले उचलली गेलेली नाहीत.


170 घंटागाड्यांवर भार
देशाला आदर्श ठरणारा घनकचरा प्रकल्प अपु-या यंत्रसामुग्रीमुळे पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. शहर व परिसरातून कचरा आणणा-या 170 घंटागाड्यांपैकी पालिकेच्या 120 घंटागाड्या आहेत, तर 50 ट्रॅक्टर ठेकेदाराचे आहेत. मात्र प्रचंड कच-यामुळे सर्वच ठिकाणी घंटागाड्या नियमित फिरत नाहीत. त्यामुळे सुमारे 20 ते 30 घंटागाड्या कमी पडतात. त्यामुळे महासभेत नवीन घंटागाड्यांना मंजुरी देण्याचा ठरावही झाला.


दरवर्षी चार कोटी रुपयांचा धुरळा
न उचलल्या जाणा-या कच-यामुळे डास, रोगराई पसरू नये यासाठी औषध व धूर फवारणी बंधनकारक आहे. मात्र पालिकेने वर्षासाठी 4 कोटींचा ठेका देऊनही पावसाळ्यात डेंग्यूसह इतर आजार पसरले होते. आजही कित्येक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव तसाच आहे. मग ठेकेदार कोठे अन् कधी फवारणी करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


20 कचराकुंड्यांचा तुटवडा
रामकुंड व गोदाघाट परिसरात कचरा संकलनासाठी ठेवलेले 15 निर्माल्य कलश अपुरी असल्याने गोदापात्रात कचरा टाकला जातो. या ठिकाणी अजून किमान 20 कचराकुंड्यांची गरज आहे.असे आहेत कर्मचारी
उपलब्ध अपेक्षित
विभागीय आरोग्य अधिकारी 6 15
स्वच्छता निरीक्षक 36 38
मुकादम 30 9
सफाई कामगार 1993 1724
ही आकडेवारी 2011 च्या लोकसंख्येनुसार आहे. तीन वर्षांतील लोकसंख्या वाढीनंतरही कर्मचारी संख्या तेवढीच आहे.


प्रकल्पात ढीग पडून
सर्वच कच-यावर प्रक्रिया होत नसल्याने प्रकल्पात साचलेल्या ढिगा-यांमुळे वायूप्रदूषण होते, तर पावसाळ्यात येथून प्रचंड प्रमाणात दूषित पाणी वाहते. ते टाळण्यासाठी कच-यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करण्याची गरज आहे.


थेट सवाल
डॉ. सुनील बुकाणे,
आरोग्य अधिकारी, मनपा

कोट्यवधी रुपये खर्च करूनही अस्वच्छतेची समस्या का आहे?
- पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी मंजूर कर्मचा-यांच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. घंटागाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी कच-याची समस्या आहे.
फवारणी करूनही डासांचा उपद्रव वाढतच आहे.
- धूर व औषध फवारणीसाठी नेमलेले खासगी ठेकेदार नियमित फवारणी करतात. परंतु, जिथे फवारणी होत नसेल त्याची दखल घेऊन सूचना केल्या जातील.
घंटागाड्या वाढवणार का?
- सध्या पालिकेकडे 120 घंटागाड्या असून, ठेकेदाराच्या 50 गाड्या आहेत. त्या कमी पडत असल्याने त्यांची संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी 30 घंटागाड्या खरेदीचा विचार आहे.