आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Politics, Lok Sabha Election, Divya Marathi

निवडणुकीच्या आखाडा: सेनापतींचे सारथ्य अन् कर्मदरिद्रीपणा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - श्रीकृष्णाच्या कर्तृत्वाबरोबरच त्याच्या सारथ्य कौशल्याचाही उल्लेख महाभारतात आढळतो. अर्थात विचारांच्या तात्त्विक बैठकीतून परिपूर्ण होऊन आल्याने कृष्णाने ज्यांचे सारथ्य केले त्यांना कधीही अडचणीत टाकल्याचे ऐकिवात नाही. किंबहुना त्यांच्या सारथ्याने तत्कालीन सेनापतींचा उध्दारच झाला आहे. पण, विचारांशी ज्यांचा कवडीमात्र संबंध नाही आणि ज्यांनी केवळ बाहुबलावरच आपले ‘साम्राज्य’ उभे केले अशांना जर कोणा सेनापतीने सारथ्य करण्याची संधी दिली तर त्याला कर्मदारिद्रय़ाशिवाय दुसरे काय म्हणावे?


राजकीय डावपेचांचे धडे ज्या धर्मग्रंथातून घेतले गेले; त्या महाभारतात सारथ्यकौशल्यालाही महत्त्व असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्जुनाचे सारथ्य करण्यासाठी श्रीकृष्ण धावून गेला. कारण श्रीकृष्णाच्या बौध्दिक चातुर्याचा अर्जुनाला फायदाच होणार असल्याचे अवगत होते. दुसरीकडे कर्णाचे सारथ्य करण्याची संधी महाराजा शल्यावर देण्यात आली. कारण राजा शल्य हा युध्दकलेतही पारंगत होता आणि तो श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी असल्याचे मानले जात होते. मात्र, राजा शल्याने कर्णाला युध्दाप्रसंगी त्रस्तच केले आणि त्याच्या हेकेखोर स्वभावापोटीच कर्णाला मरण पत्करावे लागल्याचाही संदर्भ महाभारतात आढळतो. कुरुक्षेत्रची ही लढाई राजकीय सारीपाटावरचे आदर्श उदाहरण म्हणून मानले जाते आणि त्यामुळेच या लढाईतील डावपेचांना आधुनिक स्वरूप देऊन आजही तशाच पध्दतीने राजकारण करण्याची पध्दत रूढ आहे. मात्र, सांप्रत काळातील काही सेनापतींना महाभारताचा विसरच पडला की काय, अशी शंका उपस्थित झाल्यावाचून राहात नाही.


झाले असे की, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेची बैठक नाशकात झाली. त्यात उध्दव ठाकरेही उपस्थित होते. परंतु, ठाकरे हे बैठकस्थळी वाहनाने आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. ज्यांना केवळ आणि केवळ गुंडगिरीच्या निकषावर मनसे आणि राष्ट्रवादीतून बेदखल करण्यात आले होते, अशा बाहुबली नेत्याला शिवसेनेने कवेत घेतलेच; शिवाय नाशकातील बैठकीप्रसंगी त्यांना उध्दव ठाकरे यांचे सारथ्यही करायला लावले. या वेळी नेहमीप्रमाणे ठाकरे यांचे ‘सुहास्य’ निदर्शनास आले असले तरीही नाशिककरांचे हास्य मात्र त्यामुळे मावळल्यावाचून राहिले नाही. परंतु, त्याचाही विचार न करता थेट सारथ्यकर्माची जबाबदारी देऊन पक्षाने अकलेचे ‘कांदे’ केले ते खरेच!