आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Preganant Woman, Divya Marathi

गर्भवती मातांची बुडीत मजुरी दुप्पट, निवडणुकीचा परिणाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अतिमागास अशा 125 तालुक्यांतील मानव विकास कार्यक्रमांतर्गत गर्भवती मातांच्या बुडीत मजुरीत दुपटीने वाढ करण्यात आली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गर्भवती मातांबरोबरच डॉक्टरांचे मानधनही वाढवण्यात आले.
राज्यातील 22 जिल्ह्यांत मानव विकास कार्यक्रम राबवला जातो. यात गर्भवती मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्रसूतीपर्यंतच्या विविध टप्प्यात त्यांचे संगोपन करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.

प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा दिल्यावरही माता येत नव्हत्या. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आरामाऐवजी काम करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे बुडीत मजुरीच्या रूपात 800 रुपये देण्याचा निर्णय झाला. मात्र, दोन वर्षांनंतर त्यातून मजूर मातांना फारसा लाभ होत नसल्यामुळे पुन्हा त्या मजुरीकडे वळत असल्याचे समोर आले. नागपूर अधिवेशनात बुडीत मजुरी वाढवण्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार, आता मातांना दुहेरी लाभ दिला जाणार आहे. प्रसूतीपूर्व दोन महिने महत्त्वाचे असल्यामुळे या काळात दोन हजार रुपये मजुरी मिळणार आहे. प्रसूतीनंतर पहिले दोन महिने महत्त्वाचे असल्यामुळे दोन हजार रुपये मजुरी दिली जाणार आहे. जेणेकरून मातांना आराम करण्याबरोबरच बालकाला दुग्धपान करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.


माता, बालमृत्यू टळतील
गरोदरपणाच्या काळात मातांकडून मजुरी मिळवण्याच्या नादात दुर्लक्ष होते. त्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रकार होतात. आता दोन हजार रुपये मजुरी मिळणार असल्यामुळे त्यांना आराम करणे सोपे होईल. डॉ. विद्याधर कुलकर्णी, आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद

डॉक्टरांचे मानधनही वाढले
बालरोगतज्ज्ञांना दिले जाणारे मानधन अत्यल्प असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शिबिरांकडे ते पाठ फिरवत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर दोन हजारांहून अडीच हजारांपर्यंत मानधन वाढवण्यात आले.