आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, RGP Company, Satpur MIDC, Divya Marathi

सातपूरच्या आरजीपी कंपनीला भीषण आग,अर्धा तास आधीच सुटी दिल्याने टळली प्राणहानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूर एमआयडीसीतील आरजीपी एंटरप्रायजेस या कंपनीला रविवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी 12 अग्निशमन बंब आणि 55 कर्मचार्‍यांनी अडीच तास शर्थीचे प्रयत्न केले. होळीचा सण असल्याने तासभर अगोदर कर्मचार्‍यांना सुटी दिलेली असल्याने आणि कंपनीचे सर्व शटर बंद केले असल्याने आत कोणीही नव्हते. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.


सातपूर एमआयडीसीत ‘ए’ सेक्टरमध्ये असलेल्या आरजीपी एंटरप्रायजेस या रासायनिक खते, पशुखाद्ये, बी-बियाणे साठवणूक आणि निर्मिती करणार्‍या कंपनीत सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही आग भडकली. होळी असल्याने कंपनीत कार्यरत असलेल्या 40 ते 50 कर्मचार्‍यांना दैनंदिन कामाच्या वेळेच्या तासभर आधी सुटी देण्यात आली होती. कर्मचारी गेल्यानंतर पूर्णपणे बंद असलेल्या या कंपनीला अर्धा तासातच आग लागली. कंपनीच्या वॉचमनने ही आग बघितल्यानंतर अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. सर्वप्रथम सातपूर अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र, कंपनीत असलेल्या रासायनिक खते आणि द्रव्यांमुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आणि कंपनीचे शटर बंद असल्याने आग विझविणे अवघड होऊन बसले होते. कं पनीचे संचालक आणि नाशिक जिल्हा अँग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय गडाख यांचा बंगला कंपनीच्या बाजूलाच असल्याने डोळ्यासमोर कंपनी जळताना बघून ते सुन्न झाले होते. उद्योजक राजेंद्र छाजेड, संजय न्याहारकर यांसह मोठय़ा संख्येने उपस्थितांनीही आग विझविण्यासाठी मदत केली.


आगीचे कारण स्पष्ट नाही
अग्निशमन मुख्यालयासह सिडको, नाशिकरोड, पंचवटी या विभागातील अकरा, तर महिंद्रा कंपनीचा एक असे बारा बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या 55 कर्मचार्‍यांनी पावणेदोन तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर ही आग रात्री 8.30 वाजता आटोक्यात आली. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.


केमिकलमुळे जास्त भडका
कंपनीत असलेली कृषी औषधे, रसायने, पॅकिंग मटेरियल्स, बी-बियाण्यांच्या बॅग्ज असे साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. अनिल महाजन, मुख्य अग्निशमन अधिकारी