आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 टनी दरड असली तरीही गड सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देशातील सर्वाधिक बुद्धिवंतांची खाण गणल्या जाणार्‍या आयआयटी पवईच्या तज्ज्ञांकडून सर्वेक्षण झाले..संपूर्ण देशात केवळ हिमाचल प्रदेशात आणि अत्यल्प प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील डोंगरांकरता वापरल्या गेलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला..त्यातून सुमारे 525 फूट आडव्या आणि 450 फूट उभ्या डोंगरावर असे भक्कम लोखंडी तारांचे जाळे बांधले जात आहे, की त्या सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेल्या डोंगरालाही जणू आता आपण सुरक्षित झाल्याचा आभास व्हावा..तब्बल 5 टनांपर्यंतची (5 हजार किलो) दरड कोसळली तरी ती मंदिरावर कोसळू न देता तोलून धरणारे अत्यंत अशक्यप्राय भासणारे हे काम अवघ्या 40 जिगरबाज प्रशिक्षित युवकांच्या माध्यमातून साकार होत आहे.


सप्तशृंगगड सुरक्षित राखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणि मॅकाफेरी एनव्हॉयर्नमेंटल सोल्युशन्स या मल्टिनॅशनल कंपनीच्या माध्यमातून केले जात असलेले काम पाहणार्‍याचे नेत्र विस्फारणारेच आहे. मात्र, प्रशिक्षित युवक करत असलेले भविष्यातील दुर्घटना टाळणारे हे कार्य खरोखरच विशेष आहे.
दरड दबणार जाळीतच! या कामामुळे तब्बल 5 टनांपर्यंत वजन असलेली दरडदेखील मंदिरावर कोसळू शकणार नाही. एखादी दरड जरी निखळली, तरी जाळीच्या आत दबून राहील. छोटे दगड असतील, तर ते जमिनीपर्यंत खालून गुंडाळलेल्या जाळीत रोखले जातील.


प्रतिबंधक योजनेंतर्गत कामाचे दोन टप्पे
योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या कामाचे दोन टप्पे आहेत. त्यात प्रथम संपूर्ण गडाला छोट्या आणि मोठय़ा जाळीने भक्कम बांधले (नेट इन) जात आहे. डोंगराच्या खाच्यांमध्ये ठिकठिकाणी भक्कम खांब रोवून त्यावर छोटी जाळी (स्टीलग्रेड) बांधली जाते. त्यावर मोठय़ा जाळीचे (हाय एनर्जी अँब्सॉर्पशन पॅनल) आवरण चढवले जाते. दुसरा टप्पा हा ‘रॉकफॉल बॅरिअर’चा आहे. त्यात केवळ मंदिरावर सर्कसमध्ये कसरतपटूंच्या खाली असते, तशी झुलती जाळी बांधली जात आहे. त्यामुळे मंदिराच्या वरील भागात छोटी जाळी, मोठी जाळी आणि ‘रॉकफॉल बॅरिअर’ अशी तिहेरी तटबंदी होणार आहे.


कठोर प्रशिक्षणामुळेच हे अवघड काम शक्य
मनाली येथील संस्थेत या कामाचे तीन महिने विशेष प्रशिक्षण घेतले. कंपनीनेदेखील सराव घेतला. आता भीती वाटत नाही. देवराज ठाकूर, प्रशिक्षित क्लायंबर


मे महिन्यापर्यंत काम होणार पूर्ण
मंदिरावरील काम 7 मार्चपर्यंत तर गडाला जाळी लावण्याचे काम मार्चच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ‘रॉकफॉल बॅरिअर’चे संपूर्ण काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. विजय पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण