आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Shiv Sena, Hemant Godse, Divya Marathi

सिन्नर सभापतींची बंडखोरी,शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना देणार साथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - पंचायत समितीचे कॉँग्रेसचे सभापती व आमदार माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्तीय बाळासाहेब वाघ यांनी स्वपक्षालाच आव्हान दिले असून, शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोडसे यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकरांसह तालुक्यातील वाघ यांचे सर्मथक या वेळी उपस्थित होते. आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याबद्दल कॉँग्रेसकडून कारवाई होणार नाही, या प्रश्नावर कारवाई झाल्यास आपण थेट शिवसेनेत प्रवेश करू, असे वाघ यांनी सांगितले.


संभाव्य परिणाम
कॉँग्रेस पक्षाकडून सभापती वाघ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याबाबत साशंकता आहे. मात्र, कारवाई झाल्यास पंचायत समितीतील सत्ताकारणावर परिणाम शक्य. सध्या पंचायत समितीत कॉँग्रेस सत्तेत, तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विरोधात. बाळासाहेब वाघ यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकिटाची मागणी केल्याचीही चर्चा. वाघ यांच्यावर कारवाई न झाल्यास कॉँग्रेस व राष्ट्रवादीत सिन्नरमध्ये असलेला विसंवाद चिघळण्याची शक्यता.


राष्ट्रवादीलाच गरज नाही
पंचायत समितीचे सभापती वाघ यांच्या भूमिकेबाबत कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांना विचारणा केली असता राष्ट्रवादीकडून सिन्नर तालुका कॉँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. गरज नसल्यासारखी वागणूक आम्हाला मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोडसेंना पाठिंब्याची वाघ यांची भूमिका व्यक्तिगत स्वरूपाची असून, निवडणुकीसंबंधी सर्वच बाबींचा विचार करण्यासाठी येत्या 2-3 दिवसांत पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे सांगळे यांनी सांगितले.


आमदार कोकाटेंशी चर्चा
व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेण्यास आमदार माणिकराव कोकाटेंची कोणतीही आडकाठी नसल्याचे वाघ म्हणाले. जर कोकाटे राणे यांच्यासाठी 100 आमदारक्या ओवाळून टाकू शकतात, तर गोडसे यांच्या मैत्रीसाठी आपणही तेवढीच सभापतिपदे ओवाळून टाकू शकतो. जिल्हा परिषद मुख्याधिकार्‍यांना काळे फासण्याच्या आंदोलनावेळी गोडसेंसह आपल्याला गुन्ह्यात गोवण्यात आले, त्यामागे भुजबळांचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मनसेच्या तीनही आमदारांनी मदत केली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.