आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Shiv Sena, Vasudev, Voting, Divya Marathi

शिवसेनेचा वासुदेव मागणार आता गावागावांत मतांचा जोगवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - टाळ-चिपळ्यांचा घुमणारा आवाज.. पायातील घुंगरांची होणारी छमछम आणि पहाटेच्या अंधाराला चिरत येणारा ‘वासुदेव आला हो, वासुदेव आला..’चा सूर जर गावात ऐकू आला तर लगबगीने धान्य वा पीठ घेऊन बाहेर पडू नये. कारण हा वासुदेव येणार आहे तो मतांचा जोगवा मागण्यासाठी. लोकसभा निवडणुकीनिमित्त शिवसेना यंदा वासुदेवांचा वापर करणार आहे. 400 गावांमध्ये हे कलाकार वासुदेवाच्या वेशांत प्रचार करणार आहेत.


लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रत्येक पक्ष प्रचारासाठी विविध फंड्यांचा वापर करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने ‘गुलाब गँग’ आणि यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित ‘बखर एका वादळाची’ हे चित्रपट दाखवून आपल्या पदाधिकार्‍यांना रिफ्रेश करीत आहेत. तर, अन्य पक्षही प्रचाराच्या नियोजनात व्यस्त आहेत. शिवसेनेच्या वतीने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने मतदारसंघातील 400 गावांमध्ये पहाटे आणि सकाळी वासुदेव फिरविण्यात येणार आहेत. हे सर्वच वासुदेव मुंबईहून बोलाविण्यात आले असून, त्यांचे पेहरावही खरेदी करण्यात आले आहेत.


शिवसेनेचा प्रचार होईल अशी गाणी लिहून वासुदेव आपल्या शैलीत म्हणणार आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत हे वासुदेव गावोगावी फिरायला सुरुवात करणार असल्याचे सेनेच्या सूत्रांनी सांगितले. एकीकडे अत्याधुनिक प्रचारतंत्र या निवडणुकीत वापरले जात असतानाच लोकसंस्कृतीतील महत्त्वाच्या अशा वासुदेवाचा वापर आता प्रचारात होणार आहे.


जगात आहे राम रे.
वासुदेव म्हटला की, प्रथम समोर येते ती ‘वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे’ हे गीत. पण, ‘जगात राम नाही’ असे म्हटल्यास कट्टर धर्मवादाला आव्हान दिल्यासारखे होते; शिवाय भाजपच्याही मतांपासून हात धुवावे लागतील, या भीतीने या गाण्यात बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार सेनेचे वासुदेव ‘जगात आहे राम रे’ म्हणताना दिसल्यास नवल वाटू नये!


शहरी भागात पथनाट्य
ग्रामीण भागात वासुदेव फिरविले जाणार असताना शहरी भागात पथनाट्याद्वारे शिवसेनेचा प्रचार केला जाणार आहे. त्यासाठी मोठय़ा संख्येने पथनाट्यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.