आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Small Political Parties, Lok Sabha Election, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: छोटे पक्षही निर्णायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या नाशिक लोकसभेतही नंबर दोन कोण राहणार तो अंदाज बांधणे थोडे कठीण झाले आहे. मागील निवडणुकीप्रमाणेच निवडून येण्याचे ‘मार्जिन’ 30 ते 40 हजारांदरम्यानच राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच माकपा, बसपाचे उमेदवार कुणाची किती मते खातात, त्यावरदेखील नाशिकच्या निकालाचे चित्र बदलू शकते.


नाशिक लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे छगन भुजबळ यांच्याविरुद्ध युतीचे हेमंत गोडसे, मनसेचे डॉ. प्रदीप पवार, ‘आप’चे विजय पांढरे अशी चौरंगी लढत राहण्याची शक्यता आहे. मात्र, यात जातीय समीकरणेही महत्त्वाची ठरणार आहेत. भाजपच्या पारंपरिक मतांमध्ये शिवसेना आणि मनसे यांच्यात विभाजन होणे निश्चितच आहे, तर पांढरे हे कोणत्या पक्षाची मते खेचतात त्यावरही कोण पहिल्या, कोण दुसर्‍या क्रमांकावर याचे गणित अवलंबून आहे.


माकपाला दुर्लक्षिण्याची चूक पडेल महागात
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार कुणीही असला तरी त्यांच्या पक्षाशी बांधिलकी असलेली किमान 20 ते 25 हजार मते नाशिक लोकसभेत आहेत. त्यातही नाशिकचे उमेदवार तानाजी जायभावे यांच्या समाजाच्या मतांची संख्यादेखील मोठी असून त्यातून काही टक्के मते जरी जायभावेंकडे फिरली तरी ती ‘बोनस’ ठरणार असल्याने ते पक्षाबरोबरच कामगार वर्गाची किती मते खेचतात ते पाहणे उदबोधक ठरणार आहे. माकपला मिळणार्‍या मतांमुळे एकूण मतांचे तसेच विजयाचे गणित ठरणार आहे हे मात्र निश्चित.

मायावतींच्या सभेमुळे पडू शकतो फरक
नाशिक मतदारसंघ हा बसपाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पक्षाशी बांधिलकी मानणारे आणि बाबासाहेबांचे नाव घेणार्‍या पक्षाला मतदान करणारा समाजदेखील नाशकात खूप मोठा आहे. मायावतींनी नाशकातील उमेदवार दिनकर पाटील यांच्यासाठी सभा घेण्यासही मान्यता दिली असल्याचे जिल्हाध्यक्ष अरुण काळे यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास नाशकातील मायावतींच्या सभेमुळे दिनकर पाटील यांच्या मतांच्या संख्येत मोठा फरक पडू शकतो. नाशकात गेल्या लोकसभा निवडणुकीत बसपाकडून उतरलेल्या महंत सुधीर पुजारी यांना 18 हजार मते मिळाली होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी मिळवलेली ही मते पक्षाची होती, असे पकडल्यास दिनकर पाटील त्यापासून पुढेच खेळण्यास प्रारंभ करतील. अर्थात त्यातही दिनकर पाटील यांचे नातेसंबंध, त्यांचा सातपूर विभाग तसेच बंधू दशरथ पाटील यांचा लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरणार आहेत. त्यामुळे बसपाच्या सूत्रानुसार निवडून येण्याची ताकद नसेल तिथे पाडा हे तत्त्व नाशिकमध्येही लागू राहण्याची शक्यता आहे.