आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Soil Fertality Level, Crops, Divya Marathi

पोत सुधारण्यासाठी तीन वर्षे, हेक्टरी पाऊण लाखाचा येणार खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पिकांना रोगप्रतिकाराबरोबरच पोषणासाठी आवश्यक असलेले मातीतील जिवाणूच राज्यातील गारपिटीमुळे नष्ट झाले आहेत. जमिनीमध्ये एक ते दीड फुटापर्यंत जिवाणू मरण्याचे प्रमाण असल्याने जमिनीचा पोतच खराब होणार आहे. त्यामुळे पोत सुधारेपर्यंत साधारणत: दोन ते तीन वर्षे उत्पादनावर परिणाम होणार आहे. पारंपरिक पिकांऐवजी शेतकर्‍यांना डाळवर्गीय पिके घ्यावी लागणार असल्याने कृषीक्षेत्राचे स्वरूपच बदलणार आहे. जमिनीचा पोत पूर्ववत होण्यासाठी शेतकर्‍यांना अंदाजे हेक्टरी पाऊण लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे सुमारे पंधरा हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी गारपिटीने, तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍याने बागा कोसळल्या आहेत. नाशिकमध्ये द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, गहू, हरभर्‍याची शेती मोठी असून, येथील जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकर्‍यांना मातीचे परीक्षण करून त्यानुसार जैविक खतांचा वापर करावा लागणार आहे.
काश्मीरची स्थिती आपल्यापेक्षा भिन्न : आपल्याकडील गारपीट आणि काश्मीरमधील हिमवृष्टीत खूप फरक आहे. हिमवृष्टी ही ठरावीक काळात होत असल्याने तेथील शेतकरी त्यानुसार पिके घेतात. तेथीलभाजीपाला, केशर आणि सफरचंद हे थंडीतीलच पिके असल्याने त्यावर परिणाम होत नसल्याचे शास्त्रज्ञ डॉ. सतीश बोंडे यांनी सांगितले.
हे जिवाणू झाले नष्ट
गारपिटीनंतर गारा वितळण्यासाठी सुमारे चोवीस तासांहून अधिक कालावधी लागला. त्यामुळे जमिनीतील बॅसिलस, अँझॉटो बॅक्टर, रायझोबियम, ऍक्टिनोमायसीड्स, सियडूमोनॉस या जिवाणूंचा अंत झाला आहे. हे जिवाणू झाडाच्या मुळांना अन्नद्रव्य मिळवून देण्यास पोषक ठरतात.
हा आहे पर्याय
जिवाणू नष्ट झाल्याने जमिनीतील पोत खराब झाला असून, शेतकर्‍यांनी पारंपरिक पिकांऐवजी हरभरा, तूर, मूग, भुईमूग, उडीद, डेमचा आणि ताग या पिकांना प्राधान्य द्यावे.
शास्त्रज्ञांकडून तपासणी
राज्यात माती तपासणीसाठी शास्त्रज्ञांची पथके पाठविण्यात आली आहेत. आढावा घेऊन 18 आणि 19 मार्चला सर्व माहिती द्राक्ष उत्पादकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. गारपिटीमुळे जिवाणू नष्ट झाले असतील. डॉ. एस. डी. सावंत, द्राक्ष शास्त्रज्ञ, पुणे
मातीचे परीक्षण करावे
गारपिटीमुळे जिवाणू नष्ट झाल्याने आता जमिनीचा पोत सुधारण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. जिवाणूमध्ये हवेतील रोगप्रतिकारकशक्ती असते. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घेऊनच पुढील उत्पादन घ्यावे. -डॉ. सतीश बोंडे, कांदा शास्त्रज्ञ