आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Sudam Kombade, Corporator, Divya Marathi

तोडफोड केल्याप्रकरणी नगरसेवक सुदाम कोंबडे यांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - पाथर्डी गाव परिसरात महापालिका शाळेजवळ राहणार्‍या सहा जणांच्या घरात घुसून जबरदस्तीने जेसीबीद्वारे या घरांची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोंबडे व त्यांच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली.
मजुरी करणारी सहा कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. यातील शंकर जाधव यांनी इंदिरानगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गुरुवारी सकाळी 9 वाजता कोंबडे व त्यांच्यासह 12 ते 14 कार्यकर्त्यांनी जेसीबी आणून सहा कुटुंबीयांच्या घरात घुसून त्यांचे साहित्य बाहेर फेकले. या कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता घरांवर जेसीबी चालवित मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्यासह शेजारी राहणारे आनंद मनोहर भाले, अनिल विश्वनाथ घूम, शंकर विष्णू जाधव, छबू विष्णू जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यासंदर्भात सहायक पोलिस आयुक्त हेमराजसिंग राजपूत व वरिष्ठ निरीक्षक रमेश यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंबडे यांच्यासह त्यांच्या पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेतील जेसीबी यंत्र (एमएच 15, बीडब्ल्यू 2393) जप्त करण्यात आले आहे.


घरात घुसून साहित्य फेकणे चुकीचे
नगरसेवक कोंबडे यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन घरात घुसणे आणि कुठलीही परवानगी अथवा आदेश नसताना स्वत:च जेसीबी घेऊन घर पाडणे हे चुकीचेच आहे. कोंबडे व सहकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. - हेमराजसिंग राजपूत, सहायक पोलिस आयुक्त