आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील गारपीट द्राक्ष, कांद्याच्या मुळावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळनंतर झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यंदाच्या हिवाळ्यात यापूर्वीही बेमोसमी पावसामुळे आधीच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यात या पावसाची भर पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.


शहरासह जिल्ह्यातील पिंपळगाव, निफाड, मनमाड, सुरगाणा, येवला, दिंडोरी, चांदवड, सटाणा, कळवण, सिन्नर आणि नाशिक तालुक्यांत गारपीट झाली. नाशिक परिसरात सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. पावसाला सुरुवात होताच विजेचा लपंडाव सुरू झाला. मात्र, कर्मचार्‍यांनी वेळीच दुरुस्ती करून पुरवठा सुरळीत केला. पंचक येथील मुख्य वीजवाहिनी रात्री 8 ला नादुरुस्त झाल्याने नाशिकरोड भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यात दोन दिवसांपासून तपमानात वाढ झाली होती; परंतु सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन सायंकाळनंतर पाऊस पडला. सोनेवाडी, पळसे, मालेगाव, वडनेरभैरव, वडाळीभोई येथे दीड तास जोरदार पाऊस झाला.


ओझरला तासभर पाऊस
ओझर टाऊनशिप परिसरातही सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर येथे पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.


चांदवडला मोठे नुकसान
चांदवड शहरासह तालुक्यात सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आलेल्या बेमोसमी पावसामुळे कांदा, द्राक्ष, मका, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. उघड्यावरील कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली. चांदवडला आठवडे बाजारामुळे विक्रेत्यांची धावपळ झाली.


कळवणला गारपीट : तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज तहसीलदार अनिल पुरे यांनी वर्तविला असून, तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. दळवट, शिंगाशी, जामले, हातगड, बिलवाडी, भांडणे परिसरात अर्धा ते एक फुटाचा गारांचा थर जमा झाला होता. द्राक्ष, स्ट्रॉबेरीबरोबरच कांदा, गहू, टोमॅटो, मिरची, कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले आहे. ए. टी. पवार व जिल्हा परिषद अध्यक्षा जयर्शी पवार हे मंगळवारी नुकसानीची पाहणी करणार आहेत.
सटाण्यातही गारपीट : बागलाण तालुक्यात सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब व कांदा पिकांचे नुकसान झाले. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी मंगळवारी सकाळपासून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मनमाडला अर्धा तास पाऊस : शहर व परिसरात रात्री आठनंतर सुमारे अर्धा तास बेमोसमी पाऊस झाला. कांद्यासह इतर शेतीपिकांच्या नुकसानीचा अंदाज आहे.
सुरगाण्यात स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान : शहर व परिसरात झालेल्या गारपिटीमुळे इतर पिकांसह स्ट्रॉबेरीचे येथे मोठे नुकसान झाले आहे. येथील बहुतेक शेतकर्‍यांनी लाखो रुपये खचरून स्ट्रॉबेरीची शेती विकसित केली आहे. द्राक्षाप्रमाणेच स्ट्रॉबेरी अतिशय नाजूक असल्याने येथे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.