आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik News In Marathi, Voting List, Divya Marathi

नावे मतदार यादीत टाकण्याच्या प्रक्रियेमुळे प्रशासनाची दमछाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विशेष मतदार नोंदणी मोहिमेत रविवारी संकलित झालेल्या 75 हजार अर्जदारांची नावे मतदार यादीत टाकण्याच्या प्रक्रियेमुळे प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे नव्याने येणारे अर्ज स्वीकारले तरीही यादीत नाव येण्याची शक्यताच कमी असल्याने नवमतदार नोंदणी मंगळवारपासून बंद करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी विलास पाटील यांनी दिला. परंतु, नागरिकांनी अर्ज स्वीकारण्याचा आग्रह धरल्याने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह चारही विधानसभा मतदारसंघ नोंदणी कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला होता.


9 मार्चच्या नोंदणी मोहिमेतही ज्यांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नाही, अशा नागरिकांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी गर्दी केली; मात्र तांत्रिक कारणास्तव सोमवारनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केल्याने या नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. कारण नामनिर्देशनपत्र सादरीकरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत असतानाही प्रशासन अर्ज का घेत नाही, असा सवाल उपस्थित करत ते स्वीकारण्याचा आग्रहच धरला. त्यानुसार अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र, ही सारी नावे यादीत येतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे, तर यादीत नाव येणार नसल्याने आता मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही प्रमाणात अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. काहींनी मात्र गुपचूप तेथून निघून जाण्यातच धन्यता मानल्याचे चित्र दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसत होते. यंत्रणाही आलेले अर्ज स्वीकारत असून, वेळेत यादी तयार करण्यासाठी विशिष्ट कालावधी (दिनांकाची) निश्चित करणे आवश्यक आहे. कारण आलेल्या अर्जांची चौकशीही होणे अपरिहार्य आहे. त्यास आठ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागणार आहे. त्यानुसार आलेल्या अर्जांसाठी सोमवार (10 मार्चचे अर्ज) आणि काही प्रमाणात मंगळवार (9 मार्चचे अर्ज) अंतिम केला असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.


अर्ज न घेणे हा अन्याय
नाव नोंदविण्याची मुदत असतानाही अधिकारी अर्ज घेत नाही. शिवाय आम्ही झेरॉक्स काढून अर्ज आणले आहेत. मुलांचेही अर्ज आहेत. आम्ही बोगस मतदारांची नावे यादीत घुसविण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आमची नावे घेतलीच पाहिजेत. अर्ज न घेणे हा अन्याय आहे. जिजा घोडेराव, त्रस्त महिला


नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत
अर्जांची वाढती संख्या पाहाता एका केंद्रावर असलेली 1700 मतदारांची र्मयादा वाढणार आहे. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. शिवाय यादीही वेळेत तयार होणे आवश्यक आहे. तसेच केंद्र वाढल्याने यंत्रांचीही संख्या वाढेल. याचे सर्व नियोजन करण्यासाठी वेळ हवा असून, आता अंतिम टप्प्यात तो नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार यादीत नावे टाकण्यासाठी अंतिम मुदत ही सोमवारपर्यंतच दिली आहे. परंतु, नव्याने अर्ज करणार्‍या प्रत्येकाचे अर्ज स्वीकारले जात असून, निरंतर मोहिमेद्वारे ते यादीत समाविष्ट केले जातील. त्यांना पुढील निवडणुकीत मतदान करता येईल. गणेश राठोड, तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी