आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक - ‘जनतेने टोल भरू नये व त्यांच्याकडून बळजबरीने टोल वसूल केला तर कंत्राटदाराच्या घरात घुसून धडा शिकवू,’ या राज ठाकरे यांच्या दिलासादायी इशार्यामुळे टोलनाक्यांवर वाहनचालक व कर्मचार्यांत खटके उडू लागले आहेत. टोल भरणार नाही, असे सांगणार्या वाहनचालकांना कर्मचार्यांच्या दंडेलीला सामोरे जावे लागत असून, या वादात वाहतूक खोळंबण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, अशा एकट्या-दुकट्या वाहनचालकाला संरक्षण देण्यासाठी राज यांच्या आदेशाप्रमाणे मनसैनिकही हजर नसल्यामुळे कोणाच्या भरवशावर वाद घालायचा, असाही प्रश्न विचारला जात आहे.
टोलविरोधात 12 फेब्रुवारीला ‘रास्ता रोको’ केल्यानंतर दुसर्या दिवशी राज यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यात राज्यातील दहा कोटींच्या आतील जवळपास 20 टोलनाके बंद करण्यात आले. केवळ टोलनाके बंद होऊन चालणार नाही, तर वसुलीत पारदर्शकता आणण्याची मागणी राज यांनी केली होती. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून, त्यात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. जनतेला बळजबरीने टोल भरण्यास भाग पाडले तर कंत्राटदाराच्या घरात घुसून मनसे कार्यकर्ते धडा शिकवतील, असाही इशारा राज यांनी दिला.
प्रत्यक्षात त्यांच्या आवाहनाप्रमाणे वाहनचालकांना संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यासाठी मनसेचे पदाधिकारीच नसल्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र अनेक टोलनाक्यांवर होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून जाणार्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील सहा आणि नॅशनल हायवेच्या दोन्ही टोलनाक्यांवर वाहनचालकांचे खटके उडू लागले आहेत. टोलनाक्यावरील कर्मचार्यांच्या दंडेलशाहीपुढे वाहनचालकांना इच्छा नसूनही मान तुकवावी लागत आहे.
तक्रार आली तर धडा शिकवू
टोल भरण्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीने वसुली केल्याची तक्रार वाहनचालकाने केली तर मनसे कार्यकर्ते धडा शिकवतील. जनतेनेही टोलविरोधी आंदोलनात उतरण्याची गरज असून, मनसेचे कार्यकर्ते जनतेच्या हातात हात घालून जाब विचारतील. वसंत गिते, आमदार तथा प्रदेश चिटणीस
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.