आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेलाच झाली उद्याने ‘नकोशी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात 400 उद्याने असली तरी त्यांच्या देखभालीसाठी तुटपुंजी तजवीज करण्यात आली आहे. पालिका अंदाजपत्रकात उद्यानासाठी एक टक्का तरतूद असताना त्यातही अपुर्‍या मनुष्यबळाच्या नावाखाली देखभालीचे कुरण खासगी संस्थांना मोकळे केल्याची उदाहरणे आहेत.
1992 मध्ये पालिकेत उद्यान विभागाची स्थापना झाली. शहराला नवीन रूप देताना नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची गरज होती. प्रत्यक्षात उद्यानांना दुय्यम महत्त्व दिले गेले. उद्यानांची देखभाल पालिकेने खासगी कंत्राटदारांवर सोपवली. पालिकेच्या सन 2013-14 च्या अंदाजपत्रकात या विभागाची देखभाल परवडत नसल्याचा सूर व्यक्त करीत खासगीकरणाचा आग्रह कायम ठेवला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता पालिकेने उद्यान विभागासाठी अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदी बोलक्या आहेत.

प्रमोद महाजन उद्यान
आजघडीला शहरातील कोणत्याही बालकाला विचारले, ‘बेटा, कोणत्या उद्यानात जायचे तुला?’ तर एकच उत्तर मिळते, ‘गंगापूररोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यान.’ साडेतीन एकरवरील या उद्यानाचे उद्घाटन 1 नोव्हेंबर 2007 मध्ये झाले. एप्रिल 2010 मध्ये 38 लाख रुपये खर्च करून बसवलेले आर्टिफिशियल वाघ, हत्ती अशा प्राण्यांनी चार चाँद लावले. या उद्यानात चिमुरड्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीही विरंगुळा देणारी
व्यवस्था आहे.

येथे चांगली खेळणी
मी पंचवटीत राहतो. शनिवार व रविवारी आई-बाबांबरोबर प्रमोद महाजन गार्डनमध्ये येतो. येथे चांगली खेळणी तर आहेच; मात्र हुबेहूब दिसणारे प्राणीही आहेत. खेळायला मजा वाटते.
आदित्य कुलकर्णी, इयत्ता तिसरी

शिवाजी उद्यान
1980 च्या दशकात सीबीएसजवळील शिवाजी गार्डन हे नाशिकचे प्रमुख आकर्षण होते. या उद्यानात मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर वाघ, सिंह आबालवृद्धांचे आकर्षण होते. मात्र, जसा नाशिकचा विकास सुरू झाला, तशी शिवाजी गार्डनला उतरती कळा लागली. खास करून सीबीएस व कान्हेरेवाडीच्या भागातील कुंपण तुटून पडले. नावाला नवीन खेळणी बसवली असली तरी त्यातील अनेकांना गंज चढला आहे, तर काही तुटलेली आहेत. संगीतावर डोलणारे पाण्याचे कारंजे बंद पडले.

रोमिओ गार्डन
माझे 40 वर्षांपासून या उद्यानात येणे-जाणे आहे. मात्र, आता रोडरोमिओ, प्रेमीयुगुलांचे वाढते प्रमाण यामुळे घरातील महिलावर्गाला आणण्याची भीती वाटते. प्राणी तर गेले. खेळणीदेखील तुटली आहे.
गुलाम शेख, सारडा सर्कल.

असा आहे इतिहास
स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालिन कलेक्टर जॅक्सन यांची हत्या केली. जॅक्सन कलेक्टर असताना त्यांच्याकडे रावबहाद्दूर हर्डीकर यांनी शिवाजी गार्डनची जागा हस्तांतरित केली. जॅक्सनच्या मृत्यूनंतर जागा त्यांच्या पत्नीला दिली. मात्र, मायदेशी परत जात असल्यामुळे जागा त्यांनी उद्यानासाठी दिली. शहरातील पहिले उद्यान म्हणून जॅक्सन गार्डनची स्थापना करण्याचे ठरले.