आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरांचा पाहणी दौरा; शेतकर्‍यांचा घेराव, नागरिकांनी मांडल्या समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मनपा शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या पंचकच्या शाळा विस्तारीकरणाचे आदेश महापौर यतिन वाघ यांनी दिले. महापौरांनी शनिवारी सकाळी जेलरोडच्या अशोक सातभाई, रंजना बोराडे यांच्या प्रभाग 33 चा पाहणी दौरा केला. त्यावेळी नागरिकांनी प्रभागातील समस्यांविषयी तक्रारी केल्या.

तक्रारी, समस्या, अडीअडचणी समजावून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश महापौरांनी अधिकार्‍यांना दिले. त्याच वेळी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. पंचक स्मशानभूमीत बैठक व्यवस्थेचे आदेशही त्यांनी दिले. दसक चौफुलीपासून दौरा सुरू झाला. पंचक शाळा, हॉस्पिटलची पाहणी करून स्वच्छता व सुविधा पुरविणे, मैदान तयार करणे, राममंदिरच्या मोकळ्या जागेतील विहिरीवर स्लॅब टाकणे व रस्ता रुंदीकरण, डांबरीकरणास अडथळा ठरणारे चेंबर, विद्युत खांब हलविण्याचे आदेश महापौरांनी दिले.

शनिमंदिर, अयोध्यानगर, गजानननगर, उत्तम बोराडे यांच्या घरासमोर रस्ता डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पंचक मोकळ्या जागेत व सुवर्णनगरात आमदार निधीतून उद्यान, सभामंडप उभारणे आदी कामांचे उद्घाटन महापौरांनी केले. प्रभागातील विकासकामांबाबत, नगरसेवकांच्या सहकार्याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पंचक शाळा, सर्मथनगर, जुना सायखेडा रोड, राजराजेश्वरी चौक, ठाकरे मळा, गजानननगर, राहुलनगर, परिसरात सर्वाधिक तक्रारी उद्यान, रस्ते व स्वच्छतेच्या झाल्या. कर्मचार्‍यांनी सफाई केल्यानंतर स्थानिक रहिवाशांची स्वाक्षरी घेण्याचे व इतर तक्रारींबाबत संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारून समस्या सोडवण्याचे आदेश महापौरांनी दिले.

शेतकर्‍यांचा घेराव
पंचक शिवारातील मनपाच्या मलनिस्सारण केंद्रासाठी 19 एकर जमीन संपादित केली आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जमिनीची भरपाई दिली नसल्याने भूमीहीन, बेघर 15 शेतकर्‍यांनी महापौरांना घेराव घालून समस्या मांडल्या. मंगळवारी आयुक्तांसमवेत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांना महापौरांनी दिले.

आमदारांची नाराजी
प्रभागात महापौर येणार असताना ठिकठिकाणी अस्वच्छता, उद्यानात वाढलेली झाडे, खेळणीची दुरवस्था बघून आमदार उत्तमराव ढिकलेंनी नाराजी व्यक्त केली. अधिकार्‍यांना धारेवर धरले. स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.