आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-मनसेत जवळीक, एका वर्षात महाआघाडीत झाली ताटातूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केवळ एक वर्षात महाआघाडीची ताटातूट होऊन नव्या राजकीय समीकरणांमुळे महायुतीने आकार घेत प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे-शिवसेनेची जवळीक साधली गेली. स्थायी समिती सभापतिपदासाठी नाशिकरोड आणि सातपूरच्या निवडणुकीत चार हात दूर राहात मनसेने शिवसेनेला वाट मोकळी करून देत महायुतीची सुरुवात केली.
मागील वर्षी स्थायीच्या सभापती निवडणुकीत मनसे-भाजप युतीला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, रिपाइं, दोन्ही कॉँग्रेस आणि अपक्ष एकत्र आले होते. याच महाआघाडीमुळे सिडको, नाशिकरोड, सातपूर आणि पूर्व प्रभाग समित्यांमध्ये मनसेला सत्ता मिळविता आली नाही; मात्र कल्याण-डोंबिवली व ठाणे येथे सेनेला मदत करण्याबाबत शिवसेना-मनसेत राजकीय खिचडी शिजल्यामुळे साहजिकच त्या बदल्यात नाशिकमध्ये मनसेला शिवसेनेची साथ मिळणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. त्यास सोमवारच्या निवडणुकांमुळे अधिकृतपणे दुजोरा मिळाला.
स्थायीचाही मार्ग मोकळा
महायुतीमुळे आता स्थायी समिती सभापतिपदाचाही मनसेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. महाआघाडीला ब्रेक लागणार याबाबत खरे तर गेल्या पाच-सहा महिन्यांपासूनच चर्चा सुरू होती. स्थायी समितीत पक्षीय बलाबलनुसार मनसेचे पाच, शिवसेना व भाजपचे प्रत्येकी दोन असे नऊ सदस्य होतात. यामुळे महायुती स्थायीतही एकत्र आली तर मनसेचे सदस्य अशोक मुर्तडक हेच सभापती म्हणून निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे.
सिडकोत मनसेचे शेळके
सिडको सभापतिपदी मनसेचे अरविंद
शेळके अविरोध निवडून आले. राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, शिवसेनेचे उत्तम दोंदे, कल्पना पांडे व मनसेच्या रत्नमाला राणे यांनी अर्ज माघारी घेतले. मनसेला शिवसेनेची साथ लाभल्याने मनसेचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला. मागील निवडणुकीत मनसेला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने महाआघाडीशी सलगी केली होती.
एकदिलाने काम करणार
पक्षाने जबादारी सोपविली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार.
अ‍ॅड. अरविंद शेळके, सभापती, सिडको प्रभाग
सातपूरच्या शिंदेंना नशिबाची साथ
सातपूर प्रभाग समिती सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे एकमेव सदस्य विलास शिंदे यांची अविरोध निवड झाली. मनसेच्या सविता काळे, उषाताई शेळके व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विक्रांत मते यांनी माघार घेतली. कॉँग्रेसचे सदस्य दिनकर पाटील व लताबाई पाटील हे दोघेही निवडणुकीपासून दूर राहिले.
पदाशी प्रामाणिक राहीन
सातपूर विभाग पालिकेचा आर्थिक कणा आहे. जनतेच्या विकासाचे राजकारण करणार. अधिकार्‍यांनी कामाशी प्रामाणिक राहावे. विलास शिंदे, सभापती, सातपूर प्रभाग
नाशिकरोडला सेनेच्या सुनीता कोठुळे
शिवसेना आणि मनसे असे नवे राजकीय समीकरण तयार झाल्याने महाआघाडीला सत्ता गमवावी लागली. समितीवर सेनेच्या रूपाने महायुतीचा झेंडा फडकला. निवडणुकीत प्रभाग 61 मधील सेनेच्या नगरसेविका सुनीता कोठुळे यांची अविरोध निवड झाली. नगसेवक सुनील वाघ, शोभा आवारे, कन्हैया साळवे, सविता दलवाणी, संपत शेलार, शोभना शिंदे यांनी माघार घेतली. महाआघाडीच्या करारानुसार कॉँग्रेसचे सभापतिपद हुकल्याने साळवे यांनी सेनेवर टीका केली. प्रभाग सभापती पवन पवारसह राष्टÑवादीच्या वैशाली दाणी यांची गैरहजेरी होती.
शिवसेनेचा फायदाच
मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत केवळ सिडको प्रभागावर मनसेचा भगवा फडकला होता. आता महायुती झाल्यानंतर शिवसेनेच्या ताब्यात नाशिकरोड आणि सातपूर प्रभाग समित्या आल्या आहेत. महायुतीमुळे शिवसेनेचा फायदाच फायदा झाला.
पंचवटीत मनसेचा सभापती
> पंचवटी प्रभाग सभापतिपदी मनसेच्या लता टिळे यांची बिनविरोध निवड झाली. अवघ्या पंधरा मिनिटांत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
> भाजपकडून विद्यमान सभापती प्रा. परशराम वाघेरे, राष्ट्रवादीकडून रुपाली गावंड, मीना माळोदे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
जनता दरबार घेणार
प्रभागातील समस्या सोडवू. प्रभागनिहाय दौरे तसेच जनता दरबार सुरू करण्याचा प्रयत्न राहील.
लता टिळे, सभापती, पंचवटी प्रभाग