आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन पावसाळ्यात बांधकाम विभागाकडून रस्तादुरुस्तीचे काम; 187 कोटी ‘खड्डय़ात’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चार वर्षांत 132 कोटींचा खर्च करूनही महापालिकेला शहरासह परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविता आले नाहीत तसेच रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती चांगल्या पद्धतीने करता आली नसल्याची बाब उघड झाली आहे. खड्डे बुजविण्याची तर्‍हादेखील न्यारीच असल्याने या पावसाळ्यात महापालिकेचे खरे रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. असे असताना यावर्षी खड्डे बुजविण्यासाठी 55 कोटींची नव्याने सोय केली आहे.

यामुळे पालिका यंत्रणेचा भोंगळ कारभार या पावसाळ्यात पुन्हा उघड झाला आहे. ऐन पावसाळ्यात बांधकाम विभागाने खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेतली. त्यातही खड्डय़ांमध्ये केवळ खच टाकला जात असल्याने रस्त्यांची स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत आहे. अजूनही हॉटमिक्स तंत्रज्ञान खड्डे बुजविण्यासाठी वापरले जात असल्याने पालिकेचा कोट्यवधींचा खर्चही पाण्यात जात आहे. वास्तविक, मागील वर्षी कोल्डमिक्स मटेरिअल वापरून पालिकेने काही खड्डे बुजविले. त्याचा दर्जाही चांगला असल्याचे आढळले होते. मात्र, तरीही पालिकेच्या बांधकाम विभागाने केवळ हे तंत्रज्ञान महाग म्हणून नाकारत पुन्हा हॉटमिक्स मटेरिअल्ससाठीची निविदा प्रक्रिया राबवून खड्डे बुजविण्याचा उद्योग सुरू केला आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात
वॉटर फिलिंगसाठी आरसी- 3 हेच मटेरिअल पावसाळ्यात वापरले पाहिजे. पुरेशा रोलिंगची गरज असते. त्याशिवाय काम पक्के होऊच शकत नाही. मात्र, अनेकदा स्वस्त मटेरिअल म्हणजे 80/100 हे वापरले जात असल्याने ते टिकत नाही. डांबरातही मोठी तफावत असते. कोल्डमिक्स मटेरिअलही टिकाऊ असते. मात्र, ते महाग असते. पावसाळ्यात कामे झाल्यास ती टिकूच शकत नाही, कारण पाणी हा डांबराचा शत्रू आहे. प्रीमिक्स टाकण्याअगोदर पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

एक किलोमीटर रस्ता एक कोटीत
10 मीटर रुंद व एक कि.मी.पर्यंत चांगला रस्ता तयार करण्यासाठी एक कोटी रुपये खर्च येतो. अस्फाल्ट, बीबीएम व डब्ल्यूएम या प्रकारात तो तयार करता येतो.