आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - जुने नाशिक येथील झारेकरी कोठ येथे महापालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 62 मधील विद्यार्थ्यांना मंगळवारी शालेय पोषण आहारांतर्गत दिल्या जाणार्‍या खिचडीतून विषबाधा झाली. यामुळे नऊ विद्यार्थ्यांना उपचारासाठी कथडा येथील पालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेस निलंबित करण्यात आले असून, पोषण आहाराचा ठेकाही रद्द करण्यात आला आहे.

या शाळेत चैतन्य महिला बचत गटाद्वारे शालेय पोषण आहार पुरविला जातो. मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना या बचत गटामार्फत खिचडी वाटप करण्यात आली असता, ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. नऊ विद्यार्थ्यांना चक्कर येऊन उलट्या झाल्या. खिचडीत उंदराच्या लेंड्या व मोठय़ा प्रमाणात खडे आढळल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली तसेच या शाळेचे बांधकाम सुरू असल्याने शाळेतील पिण्याची पाण्याची टाकी शाळेबाहेर ठेवलेली आहे. खिचडी खाल्ल्यानंतर याच टाकीतील पाणी प्यायल्यानंतर हा प्रकार झाला असावा, असे येथील शिक्षकांनी सांगीतले. या शाळेत एकूण 106 विद्यार्थी आहेत. मंगळवारी 25 विद्यार्थी हजर होते. त्यातील नऊ विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास झाल्याने त्यांना डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सुमन कमलाकर वाघमारे (वय 8), पूजा रमेश थापा (7), अकसा हनिफ शेख (10), सोनम रमेश थापा (8), जुनैद इब्राहिम शेख (7), अक्षय सुरेश सकट (9), कुणाल सुभाष जाधव (10), साक्षी रमेश थापा (9), अरबाज बिलाल शेख (10) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबत संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिले. या वेळी रुग्णालय व शाळेसमोर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. भद्रकाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र गायकवाड, भगवान मथुरे यांनी बंदोबस्त ठेवला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात महापौर यतिन वाघ, आमदार वसंत गिते, समीना मेमन, संजय साबळे, शबाना पठाण, संजय खैरनार, आकाश छाजेड, हनिफ बशीर, जुबेर हाश्मी, रियाज बाबू, इम्रान पठाण आदींनी धाव घेतला.