आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या शाळांचे ‘तारे’ जमींपर; शौचालयांची कमतरता, एकाच ठिकाणी दोन वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महासत्ता बनायचे असेल तर सुशिक्षित पिढीशिवाय पर्याय नाही, असा साक्षात्कार झाल्यानंतरही ज्ञानमंदिराची व्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकारी यंत्रणेची पाऊले वळत नसल्याचे दुर्दैवी चित्र महापालिकेतील शाळांच्या दयनीय अवस्थेवरून समोर आले आहे. नुकतेच शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे महापालिकेच्या दोन मोठय़ा शाळांना प्रतिनिधीक स्वरूपात भेट दिल्यानंतर दिसलेले चित्र मन विषन्न करून सोडणारेच होते. पालिकेच्या ज्ञानमंदिरांची अवस्था भकास कोंडवाड्याप्रमाणे झालेली होती. मूलभूत सुविधांसाठी कोंडमारा होत असतानाही केवळ गरिबी व अपरिहार्यहतेमुळे तोंड दाबून मुक्क्यांचा मार याप्रमाणे विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करीत होते.

अशी दिसली दुरवस्था
‘दिव्य मराठी’ चमूने दोन दिवस शाळांचा अभ्यास केला. महापालिका शाळेतील दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात आनंदवली परिसरातील संत कबीरनगरातील शाळा क्रमांक 9 मध्ये प्रवेश केला. येथे दिवाबत्तीचा अभाव तर होताच, मात्र घाणीचे साम्राज्य होते. मुख्याध्यापकांचा बेशिस्त रिक्षाचालकांशी वाद सुरू होता. विद्यार्थी नाकावर रूमाल ठेवून अभ्यास करीत होते. आणि वडाळा गावातील शाळा क्रमांक 10, 18, 43, 49 आणि उर्दू हायस्कूलमध्ये पाहणी केली. शाळेत प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसले. मैदानावर साचलेल्या डबक्यात मुले खेळताना आढळली ़ खोल्यांच्या खिडक्यांची दरवाजे चोरीला गेल्याने वर्गात दारुच्या बाटल्या टाकण्यापर्यंत मजल गेलेली होती.

अतिक्रमित जागेत शाळा
संत कबीरनगर येथील शाळा अतिक्रमित जागेत सुरु आहे. पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. छताला ठिकठिकाणी छिद्रे पडले असून पावसाळ्यात शेडला गळती लागत असल्याने वर्गखोल्यांमध्येच पाण्याचे डबके तयार होतात. आनंदवल्ली परिसरात पर्यायी इमारत उपलब्ध करुन दिलेली नाही.

पानटपरीवर रमतात मुले
वडाळा गावातील शाळांसाठी स्वच्छतागृह तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र समाजकंटकांनी बांधकाम केलेल्या भिंतीच पाडून टाकल्या. शाळेच्या संरक्षक भिंतीला लागूनच अनधिकृत पान टपरी आहे ़ येथे अनेक टवाळखोरांचीही येजा असल्यामुळे मुलांवर विपरीत परिणाम होण्याची भिती आहे.

नळ आहेत पण पाणी नाही
पाच शाळांसाठी दोन पाण्याच्या टाक्या आहेत ़ त्यातली एक कायमस्वरुपी बंद आह़े दुसरीला फक्त पावसाळयातच पाणी असते ़तोट्याअभावी पाणी गळून जाते. त्यामुळे नळ असूनही पाण्याचा उपयोग होत नाही. मुलांना अवजड दफ्तरात एक लिटरच्या पाण्याच्या बाटलीचे ओझेही सहन करावे लागते.

शौचालयासाठी दाहीदिशा
संत कबीरनगर शाळेत शौचालयच नाही. त्यामुळे मुलींची कुचंबना होते. शाळेच्या आवारालगतच रिक्षा उभ्या केल्या जातात. महत्वाचे म्हणजे, या शाळेत दिवाबत्तीची सुविधाच नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात धडे गिरवावे लागतात. दुसरीकडे वडाळा गावातील शाळेच्या मैदानावर ड्रेनेजमधून बाहेर पडणारे गटारीचे पाणी साचले होते ़

शाळेत घुशी आणि उंदीरही
ज्या इमारतीत मुलांना आयुष्यात उभे रहायला शिकवले जाते त्या इमारतीचा पायाच उंदीर आणि घुशींनी पोखरुन पोकळ केल्याचे निदर्शनास आले ़ अनेक इमारती धोकेदायक बनल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र दुरूस्तीकडे सोयीस्करपणे काणाडोळा केला जात आहे

पोषण आहारही बेचव
महापालिकेच्या विविध शाळेत विद्यार्थ्यांना दररोज दिल्या जाणार्‍या पोषण आहाराबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या. पोषण आहारात कधी तेल नाही तर कधी मीठ नाही. बेचव अन्न खात नसल्यामुळे नासाडीही होत असल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

मुख्याध्यापक व शिपाईही मीच
मागील बारा वर्षापासून शिपायांची नेमणूक करण्यात आलेली नाही ़ बाहेरच्या व्यक्तीला दरमहा पाचशे रुपये देऊन सफाई करून घेतली जाते ़ पैसे सर्व शिक्षक आपापसात वर्गणी करून देतात. काही वेळेस मलाच शिपायाची कामे करावी लागतात. गुलाम हुसेन अंसारी, (मुख्याध्यापक)

एकाच वर्गात मस्तीची पाठशाळा
यंदा उर्दू शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गुणवान विद्यार्थी आहेत, मात्र विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात वर्ग नाही. आठवीच्या वर्गातील विद्याथ्र्यी संख्या 108 आहे . खोल्यांच्या कमतरतेमुळे एकाच वर्गात सर्व विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. इरफान शेख, (मुख्याध्यापक)

सांगा, कशी राखू स्वच्छता
पाच शाळांचे मिळून दोन हजार विद्यार्थी आहेत ़ एकही स्वच्छतागृह नाही ़ मुलींना मोकळ्या जागेत जावे लागते. तेथील वर्दळ असल्यामुळे मुलींना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतो सुनंदा कदम, मुख्याध्यापिका.